अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक संकटात
तरंगवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहर व परिसरात रविवारी (दि.१४) अवकाळी पावसानं हजेरी लावली.त्याचा फटका इंदापूर,तरंगवाडी,गोखळी परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे.
मौजे तरंगवाडी येथील देविदास पुणेकर यांनी अडीच एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे.द्राक्ष विक्री योग्य झाली आहे. मात्र रविवारी (दि.१४) सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणेकर यांच्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणेकर म्हणाले की,गेल्या दहा-बारा वर्षांपासून आपण द्राक्षशेती करत आहोत.यंदा ही द्राक्षबागेसाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च केला होता.या आठवड्यात बागेत व्यापारी येणार होते.मात्र रविवारच्या पावसाने घात केला. आम्हाला हा पाऊस पाच ते सहा लाख रुपयांना पडला आहे.द्राक्षांच्या घडात पावसाचे पाणी शिरल्याने द्राक्षाला तडे पडले आहेत.
सकाळपासून हे घड काढून फेकतो आहोत..जवळपास २० ते २५ टक्के नुकसान झाले आहे.पाऊस असाच लागून राहिला तर उरलेले पिक तरी हाती लागेल की नाही याची खात्री नाही, अशी अशंका व्यक्त करत शासनाने नुकसानीची पहाणी करावी,अशी मागणी त्यांनी केली.