आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान बारामती प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान बारामती प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड?
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात आज आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आगमन झाले होते. या स्पर्धेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल करण्यात आले होते. मात्र या नियोजनात प्रशासनाकडून गंभीर त्रुटी दिसून आल्या असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
पुणे शहरात या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र बारामतीमध्ये कोणतीही शाळा सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती.उपमुख्यमंत्री अजित पवार विश्वस्त असलेल्या शाळेलाही सुट्टी देण्यात आली नव्हती.
त्यामुळे शाळेतून सुटलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
स्पर्धेमुळे उत्तर दिशेने दक्षिणेकडे जाणारे अनेक मुख्य रस्ते तसेच डिव्हायडर बंद करण्यात आले होते. याचा थेट परिणाम दैनंदिन वाहतुकीवर झाला.
अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे जाम झाले होते. विशेषतः रुग्णवाहिकांना (ॲम्बुलन्स) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी तर तातडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडल्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
हॉस्पिटलमध्ये जाणारे रुग्ण, आपत्कालीन सेवा, तसेच कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. प्रशासनाकडून पूर्वसूचना, पर्यायी मार्गांची माहिती किंवा योग्य नियोजन करण्यात आल्याचे कुठेही दिसून आले नाही.
एकूणच,आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करताना बारामतीतील प्रशासनाचा ढिसाळ व निष्काळजी कारभार उघडकीस आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आणि सोयींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. भविष्यात अशा मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करताना अधिक काटेकोर नियोजन, योग्य समन्वय आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करण्याची मागणी होत आहे.






