आईचा कोरोनाने तर मुलीचा सर्पदंशाने मृत्यू…बारामती तील दुर्दैवी घटना..
मात्र ढाळे कुटुंबातील आणि ठोंबरे कुटुंबातील या दुर्देवी घटनेमुळे जळोची गावावर शोककळा पसरली

आईचा कोरोनाने तर मुलीचा सर्पदंशाने मृत्यू…बारामती तील दुर्दैवी घटना..
मात्र ढाळे कुटुंबातील आणि ठोंबरे कुटुंबातील या दुर्देवी घटनेमुळे जळोची गावावर शोककळा पसरली
बारामती वार्तापत्र
कोरोना आजाराने आईचा मृत्यू झाल्यामुळे सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीतील जळोची येथे घडली.मनिषा ठोंबरे असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी बारामतीतील जळोची येथील आई सरुबाई बंडा ढाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनिषा ठोंबरे या इंदापूर तालुक्यातील रेडणी येथून जळोची येथे आल्या होत्या. शनिवार दिनांक २२ रोजी सकाळी सातच्या सुमारास घराच्या परिसरात झाडलोट करत असताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला.
सापाची शेपटी मनीषा यांनी पाहिली, त्यानंतर घरातल्या सर्वांनी सापाचा शोध घेतला. मात्र साप सापडला नाही आणि मनीषा यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. परंतु सगळीकडे कोरोनाचे रुग्ण असल्याने तातडीचे उपचार होण्यास उशीर झाला. त्यांचा त्रास वाढला आणि उपचारादरम्यान काल सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले.
दुपारी तीन नंतर घरातील कुटुंबीयांना वॉशिंग मशीन जवळ फरशी खाली साप जाताना दिसला.व ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना साप पकडण्यासाठी बोलावण्यात आले. सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी फरशी खाली लपलेल्या तीन फुटांचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीचा विषारी साप मोठ्या शिताफीने पकडला.व वनविभागाच्या ताब्यात दिला. वन कर्मचाऱ्यांनी सदर विषारी सापाला निर्जन स्थळी निसर्गात सोडले