आज आमची टर्म आहे कधीतरी तुमची असेल मात्र ती लवकर येणार नाही-खासदार सुप्रिया सुळे
इंदापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात सुळे यांचे वक्तव्य
आज आमची टर्म आहे कधीतरी तुमची असेल मात्र ती लवकर येणार नाही-खासदार सुप्रिया सुळे
इंदापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात सुळे यांचे वक्तव्य
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
विरोधक सारखे म्हणतात की हे सरकार एक महिन्याने, तीन महिन्याने, चार महिन्यांनी पडणार आहे. मला हे ऐकून गंमत वाटते कारण जी भांडी मोकळी असतात ती फारच आवाज करतात म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरती निशाणा साधला. आज आमची टर्म आहे कधीतरी तुमची असेल मात्र ती लवकर येणार नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, आपण पंचवीस वर्षे सत्तेत राहू हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी इंदापूर मधील शहा सांस्कृतिक भवण येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.पहा व्हिडिओ
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने,हनुमंत बंडगर,अभिजित तांबिले,तालुका प्रसिध्दी प्रमुख वसंत आरडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,पदवीधरचे पुणे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज जगताप,महिलाध्यक्षा छाया पडसाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख अँड.राजेद्र काळे,जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे,तालुकाप्रमुख नितीन शिंदे,काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत,शहराध्यक्ष तानाजी भोंग,काकासाहेब देवकर,बिभीषण लोखंडे,पिपल्स् रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, माजी शहराध्यक्ष अनिल राऊत,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,काल वाॅटस अँप वर मला एक फोटो आला.तो फोटो पाहून मी आश्चर्यचकीत झाले. कोणता जिल्हा मी सांगणार नाही तुम्ही पाहिला असेल तर समजून घ्या. त्यावर मी बोलणे मला योग्य वाटत नाही परंतू मोह आवरत नसल्याने मी बोलून टाकते. आपल्याच पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते आणि त्यांचे चिरंजीव सध्या वेगळ्या पक्षात गेले आहेत. आपल्या पक्षात होते तेव्हा त्यांचा मानसन्मान या सर्व गोष्टी होत होत्या. त्यांच्या जिल्ह्यामध्ये नुकतीच बैठक झाली.त्यांच्या जिल्ह्यात त्यांना खूप महत्त्व आहे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या वयाचे नेते त्या पक्षांमध्ये आहेत.ती सर्व मंडळी एका ओळीत खुर्ची वरती बसलेले त्या फोटोत दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे दहा नेते उभे आहेत मात्र ते केवळ उभे नाहीत तर एका कोपऱ्यात उभे आहेत. आणि लांबूनचं डोकावत आहेत की कोणीतरी येईल…! हे चित्र पाहून मला खूप आश्चर्य वाटले म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहिते-पाटील पिता-पुत्रांचे नाव न घेता टोला लगावला.
सुळे पुढे म्हणाल्या ज्या संघटनेमध्ये आपण अनेक वर्षे काम केले. त्या संघटनेला तुम्ही सोडून गेला,त्याचे मला काहीच वाटले नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे आपल्या सोयीप्रमाणे जो तो त्या पद्धतीने वागत असतो. मात्र जेव्हा तुम्ही नवीन संसारात जाता तेव्हा जुन्या संसाराला इतका विरोध हे योग्य नाही. ज्या व्यक्तींनी कधी भाषणामध्ये किंवा दौर्यामध्ये फार उत्साह दाखवला नाही, मात्र लोकसभेत आणि विधानसभेत उंबरे झिजवले. मात्र आपल्या आयुष्यात ज्यांचे योगदान असते त्यांना कधीही विसरू नये ही आपली संस्कृती आहे.एवढ्या घाईघाईने सर्व जन तिकडे गेलात मात्र मिला क्या ? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
फार मोठ्या विश्वासाच्या नात्याने महाविकास आघाडीची स्थापना झाली.या गोष्टीला परवा शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षप्राप्ती दिवशी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणार आहे. विरोधक फार मोठ-मोठ्याने वल्गना करत होते की हे सरकार नऊ दिवस चालणार नाही. मात्र एक वर्ष सरकारने काढले आणि तेही सुखात काढले. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात देशात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. त्याचे कारण की महाविकास आघाडी सरकारने कुठेही लपवालपवी केली नाही. त्यामुळे परदेशात देखील महाराष्ट्रातील कामाची नोंद लोकांनी घेतली याचा मला गर्व आहे.महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात जो विकास केला त्याची पाहणी करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसात पुण्याला येत आहेत. देशाचा पंतप्रधान जरी वेगळ्या विचाराचा असले तरी त्यांना देखील आपलेचं पुणे हवे-हवेसे वाटते आहे.महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्रातील एक वर्ष प्राप्ती ला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाविकास आघाडी सरकारने केलेले काम पाहण्यास पुण्यात येत आहेत यापेक्षा मोठं काय असू शकतं ! असे म्हणत सुळे यांनी महाविकास आघाडी सरकारची स्तुती केली.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत,पिपल्स् रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे,माजी बांधकाम समिती सभापती प्रवीण माने,शिवसेना जिल्हाप्रमुख अँड.राजेंद्र काळे, राष्ट्रावादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सावता परिषदेच्या वतीने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे लेखी पत्र संतोष राजगुरू यांनी सुप्रिया सुळे यांकडे सुपूर्त केले.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्यध्यक्ष अतुल झगडे यांनी प्रास्तविक केले.सुत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस युवकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर यांनी केले.
“दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर यांनी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख अँड.राजेंद्र काळे यांनी आपली भुमिका काय आहे ते स्पष्ट करावे म्हणताच काही वेळासाठी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यावर जिल्हाप्रमुख अँड.राजेंद्र काळे यांनी आमची भुमिका काही वेगळी नाही आम्ही आपल्याच सोबत आहोत म्हणताचं एकचं हशा पिकला..!”