आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात कायद्याविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न
नालसाच्या माध्यमातून कायद्यांविषयी होतीये जनजागृती
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात कायद्याविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न
नालसाच्या माध्यमातून कायद्यांविषयी होतीये जनजागृती
इंदापूर : प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी ( दि.२९ ) इंदापूर पोलिस ठाण्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) माध्यमातून इंदापूर प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता व आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी बोलताना इंदापूर न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश स्वानंदी वडगावकर म्हणाल्या की, सतत वापरला जाणारा बालगुन्हेगार हा शब्द चुकीचा असून कायद्यानुसार विधी संघर्षग्रस्त बालक हा शब्द प्रयोग योग्य आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून जर गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्याची नियमित होणाऱ्या प्रथम माहिती अहवालात ( एफआयआर ) नोंद न करता त्यांसाठी स्वतंत्र नोंद करावी.तसेच विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या सुधारणांसाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न झाले पाहिजेत.
यावेळी पोलीस निरीक्षक तयूब मुजावर म्हणाले की, पोलिसांना कायद्याविषयी अभ्यास असतो. प्रशिक्षणामध्ये कायदेविषयक विस्तृत माहिती दिली जाते. परंतु कायद्यात सतत होणाऱ्या दुरुस्त्या किंबहुना समाविष्ट होणाऱ्या नवीन कायद्यांविषयीची इतंबूत माहिती पोलिसांनी आत्मसात करून वेळोवेळी त्यांबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे.
तसेच यावेळी ॲड.आशुतोष भोसले यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता ( सीआरपीसी ) १९७३ मधील कायदा कलम १५४ ते १७३ यांमधील दुरुस्त्या,नवीन सुधारणा,पीडित महिला आणि लैंगिक शोषण झालेल्या बालकांच्या विषयी घ्यावयाची काळजी,गुन्हा दाखल करण्याचा अगोदरची वैदकीय तपासणी तसेच गुन्ह्यांत वापरलेले जाणारे हत्यारे व झालेल्या जख्मा त्या अनुषंगाने येणारे वैद्यकीय अहवाल आणि ट्रायलच्या वेळच्या सरकार पक्षाची बाजू या संदर्भातील विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय लिंगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,ॲड.प्रिया मखरे,पो.ह.मोहम्मदअली मड्डी,पो.ना.सुनील नगरे,पो.ना.मनोज गायकवाड,पो.ह.पवन भोईटे,पो.शी.समाधान केसकर,पो.ह.शुभांगी खंडागळे,पो.ना.जगदीश चौधर व इतर उपस्थित होते.