स्थानिक

आतातरी जागे व्हा! बारामतीतील स्तंभ स्थलांतरणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

हा हुतात्मा स्तंभ हलविण्यास सर्वांचाच विरोध आहे

आतातरी जागे व्हा! बारामतीतील स्तंभ स्थलांतरणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

हा हुतात्मा स्तंभ हलविण्यास सर्वांचाच विरोध आहे

बारामती वार्तापत्र 

गेल्या काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या अपघातात वडील व दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था नीट व्हावी यासाठी मोहीम हाती घेतली असून, प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे काही बदल दिसत आहेत.

शहरात आता वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
गतिरोधकांबाबत सध्या मागेल त्याला गतिरोधक देण्याची भूमिका नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात अनेक ठिकाणी गतिरोधक निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतराचा निर्णय झाल्यास राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधिकारी बारामतीत येऊन भिगवण चौकात आमरण उपोषणास बसतील, असा इशारा स्वातंत्र्यसैनिक संघटना व उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश कोठारी, अँड. अशोक इंगुले यांनी हा इशारा दिला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. स्तंभ स्थलांतरणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

यात नमूद केले आहे की, हा हुतात्मा स्तंभ हलविण्यास सर्वांचाच विरोध आहे. बारामतीच्या विकासाला आमचा विरोध नसून पाठिंबाच आहे. हुतात्मा स्तंभ कै. जयराम पांडुरंग सातव नगराध्यक्ष असताना बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेने स्वताः वर्गणी करुन हा स्तंभ उभारला आहे. युवापिढीला स्वातंत्र्यसेनांनीच्या कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा स्तंभ उभारला आहे.

ज्या वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्तंभ हलविण्याचे कारण दिले जात आहे, त्याच भिगवण चौकात स्तंभ स्थलांतरीत केल्यानंतर मोठे गोलाकार वर्तुळ करुन त्यात पाण्याचे कारंजे उभारण्याचा मनोदय असल्याची माहिती असल्याचे अँड. अशोक इंगुले व नीलेश कोठारी यांनी नमूद केले. जर येथे नव्याने वर्तुळ उभारले जाणार असेल तर स्तंभाभोवतीही ते होऊ शकते, त्यासाठी स्तंभ हलविण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

आमचा विरोध असूनही स्तंभ हलविण्याचा निर्णय झाल्यास राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधिकारी शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन भिगवण चौकात उपोषणास बसतील असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button