आमदार आणि खासदारांच्या गाडीवर अशोकस्तंभाचं स्टिकर लावल्याचं यापुढे कारवाई होणार!
स्वतःहून गाडीवरचे स्टिकर्स काढतात का? हे पाहावं लागेल.
आमदार आणि खासदारांच्या गाडीवर अशोकस्तंभाचं स्टिकर लावल्याचं यापुढे कारवाई होणार!
स्वतःहून गाडीवरचे स्टिकर्स काढतात का? हे पाहावं लागेल.
प्रतिनिधी
आमदार आणि खासदारांच्या गाडीवर अशोकस्तंभाचं स्टिकर लावल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र असे स्टिकर लावणं हे बेकायदेशीर असून यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे आदेश थेट वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
आमदार आणि खासदारांच्या गाडीवर अशोकस्तंभ आणि त्याखाली आमदार, खासदार असे लिहिलेले स्टिकर अनेकदा पाहायला मिळतात. मात्र असे स्टिकर्स लावण्याचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी केली होती.
देशभरात गाडीवर अशोकस्तंभ लावण्याचे अधिकार हे फक्त पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्य सभेचे उपसभापती, चीफ जस्टीस आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांना असतात.
तर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश, राज्यातले मंत्री, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभापती उपसभापती हे त्यांच्या राज्यात अशोकस्तंभ गाडीवर लावू शकतात.
मात्र हल्ली सर्रासपणे खासदार आमदार यांच्याकडून अशोकस्तंभ गाडीवर लावले जात असल्यानं या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान होत असल्याची तक्रार उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत अधिकार नसलेल्या कुणीही राष्ट्रीय चिन्ह वापरू नये आणि वापरत असल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातल्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
राम वाधवा यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाला आदेश आलेत खरे, पण आता स्थानिक पातळीवरचे पोलीस अधिकारी हे थेट आमदार आणि खासदार यांच्यावर कारवाई करायला धजावतात का? आणि मुळात पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येण्यापूर्वी आमदार खासदार हे स्वतःहून गाडीवरचे स्टिकर्स काढतात का? हे पाहावं लागेल.