आयकर विभागाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली!
आयकर विभागाने 7 ऑक्टोंबरला जवळपास 70 ठिकाणी छापे मारले. यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरचा समावेश आहे.

आयकर विभागाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली!
आयकर विभागाने 7 ऑक्टोंबरला जवळपास 70 ठिकाणी छापे मारले. यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरचा समावेश आहे.
प्रतिनिधी
आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर धाडी टाकण्यात येत आहे. यामध्ये खळबळजनक माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने नुकतेच मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसायिक कंपन्यांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही कुटुंबीयांवर छापे टाकल्यानंतर त्यांना सुमारे 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. आयकर विभागाने 7 ऑक्टोंबरला जवळपास 70 ठिकाणी छापे मारले. यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरचा समावेश आहे.
या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सीबीडीटीच्या या प्रेस रिलीजच्या आधारे अजित पवारांच्या संबंधितांचे 184 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे.
संशयास्पद व्यवहार –
आयकर विभागाला छापेमारीदरम्यान गोळा झालेल्या पुराव्यामुळे अनेक प्रथमदर्शनी बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. तसेच दोन ठिकाणच्या सुमारे 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे देणारे धक्कादायक कागदपत्रे देखील सापडली असल्याची माहिती सुत्रांमार्फत मिळाली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या कोल्हापुरातील बहिण आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी छापे टाकले होते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, यावेळी 2 कोटी 13 लाखांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 4 कोटी 32 लाखांचे सोने सापडले होते. यात प्राईमा फेसीई या व्यावसायिक कंपन्यांच्या संकेतस्थळासह व्यवहारांची तपासणी करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी हे व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसून आले
दागिनेही जप्त
पीटीआयच्या वृत्तानुसार, या दोन्ही समूहाकडे 184 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दिवशी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत 2.13 बेहिशोबी मालमत्ता आणि 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.
कुटुंबीयांच्या नावे मालमत्ता –
आयकर विभागाने दावा केला आहे की, व्यवहारांच्या देवाणघेवाणीच्या प्राथमिक विश्लेषणानुसार कंपन्यांमध्ये बेहिशोबी निधी असल्याचे पुढे येत आहे. यामध्ये बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी असमाधानकारक अॅडव्हान्सची प्राप्ती, अस्तित्वात नसलेल्या विवादांमधून एकत्रित लवादाचे व्यवहार इत्यादींचा समावेश आहे. तसेच कुटुंबाच्या सहभागासह संशयास्पद व्यवहार झाल्याचे निरीक्षण केले आहे. संशयास्पद पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे.
पैसा कुठे गुंतवला?
राज्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या कुटुंबीयांकडे ही संपत्ती सापडल्याचं सीबीडीटीने म्हटलं आहे. सीबीडीटीने प्रेस रिलीजमध्ये अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी ही संपत्ती अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेच सापडल्याचे संकेत दिले आहेत. ही बेहिशोबी संपत्ती मुंबईतील कार्यालय, दिल्लीत एका पॉश परिसरात फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रात शेत जमीन आणि साखर कारखान्यात गुंतवण्यात आली होती. या सर्व बेहिशोबी मालमत्तेची किंमत 170 कोटीच्या जवळपास असल्याचंही सांगण्यात आलं आहे.