आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांची खा.सुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे.

आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांची खा.सुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

आसाम मिझोराम राज्यांच्या बॉर्डरवर झालेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्राचे आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर २२ जुलै रोजी गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्करी विमानाने मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून सध्या उपचार सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

वैभव निंबाळकर यांची वयाच्या २२ व्या वर्षी युपीएसएसी उत्तीर्ण झालेले व भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी अशी ओळख आहे. ते मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. एस.डी.पी.ओ, बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डी.जी.पीं.कडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. काझिरंगा नॅशनल पार्क येथील एकशिंगी गेंड्यांच्या शिकारी व शिंगांची तस्करी करणाऱ्या आरोपींना त्यांनी अटक केली होती. उल्फा, के.पी.एल.टी., एन.डी.एफ.बी. सारख्या अतिरेकी संघटनांविरुद्ध दहशतवादविरोधी कारवायांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. याखेरीज ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे ते समर्थक असून जादूटोणा, अंमली पदार्थ, व्यसनमुक्ती, सायबर क्राइम इत्यादी सामाजिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

आसाम – मिझोराम बॉर्डरवर कर्तव्यावर असताना जुलै महिन्यात झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सन्मानित केले. तसेच आसामच्या पोलीस महासंचालकांकडूनही सुवर्णपदक मिळाले आहे. याबद्दल खा.सुळे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव यांच्या पत्नी अनुजा, वडील चंद्रकांत निंबाळकर, आई संगिताताई निंबाळकर, त्यांची बहीण व अभिनेत्री उर्मिला निंबाळकर, ‘स्टोरीटेल’चे पब्लिशिंग मॅनेजर व उर्मिला यांचे पती सुकिर्त गुमास्ते, अनुजा यांच्या आई शीतलताई गोरे आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, निंबाळकर कुटुंबीय प्रेरणादायी आहे. या सर्वांना भेटून अतिशय छान वाटले. वैभव हे लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते. या भेटीसंदर्भात वैभव निंबाळकर म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माझ्यासमवेत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. माझ्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याबद्दल माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!