“आय कॉलेज”ला कम्युनिटी रेडिओ स्टेशन ची मान्यता
भारत सरकारकडून मान्यता मिळालेले महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय
“आय कॉलेज”ला कम्युनिटी रेडिओ स्टेशन ची मान्यता
भारत सरकारकडून मान्यता मिळालेले महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने कम्युनिटी रेडिओ स्टेशन स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. या कम्युनिटी रेडिओ स्टेशन ची फ्रिक्वेन्सी ९०.४ एफएम इतकी आहे. हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारून पूर्ण झाले असून त्यामध्ये सर्व उपकरणे बसविण्यात आली आहेत. या स्टेशन वरील सर्व कार्यक्रमाचे प्रसारण केंद्राच्या २५ ते ३० किमी परिसरात प्रसारित होऊन त्याचा फायदा इंदापूर, बारामती, माढा, माळशिरस तालुक्यातील शेतकरी, पालक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये यांना होणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.
२६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविद्यालयातील कम्युनिटी रेडिओ स्टेशनला हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन या कम्युनिटी रेडिओ स्टेशनची सविस्तर माहिती घेतली. यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून साहेबांची मुलाखत घेतली व रेडिओ स्टेशनची यशस्वी चाचणी केली.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अशा माहितीचे प्रसारण करणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयाची समाजाशी असणारी नाळ मजबूत करणे शक्य होते. त्याचबरोबर शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करणे शक्य होते.यावेळी बाळासाहेब खटके, तुकाराम जाधव, विलास वाघमोडे, गणपत भोंग आदी संचालक तसेच सचिव मुकुंद शहा यांनी उपस्थिती दर्शवून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
▫️महाराष्ट्रातील “इंदापूर- कॉलेज” हे एकमेव महाविद्यालय आहे की,या महाविद्यालयास भारत सरकारकडून कम्युनिटी रेडिओ स्टेशनला मान्यता मिळाली आहे.▫️