आ.रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखाना येथे तलवारीने दहशत करणारा सराईत गुन्हेगार गजाआड
कामगारांच्या दारावर दगड मारत

आ.रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखाना येथे तलवारीने दहशत करणारा सराईत गुन्हेगार गजाआड
कामगारांच्या दारावर दगड मारत
बारामती वार्तापत्र
शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखाना येथे तलवारीने दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी मंगळवार(दि.
25)पर्यत पोलीस रिमांड देण्यात आलेली आहे. बंटी उर्फ विक्रम मधुकर मचाले, (रा. शेटफळगळे, ता. इंदापुर, जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार ( दि. 14) रोजी धुलीवंदन सणाच्या दिवशी सायं 6:15 वाजण्याच्या सुमारास मौजे शेटफळगढे, (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत बारामती अॅग्रो शुगर फॅक्टरीच्या समोरील हमाल चाळीच्या समोर आरोपी बंटी उर्फ विक्रम मधुकर मचाले, (रा. शेटफळगळे, ता. इंदापुर, जि.पुणे) व त्याचे इतर 2 ते 3 साथीदार यांनी हातात तलवार घेवुन भाऊ वैभव मचाले याच्या बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून साक्षीदार सुनिल रॉय याला हाताने मारहाण केली.
तसेच हातात तलवार घेवून त्याचे साथीदार यांनी मोठमोठ्याने आरडा-ओरडा करून शिवीगाळ केली. आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आम्हाला कोण आडवितो ते बघु असे म्हणुन कामगारांच्या दारावर दगड मारत त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सदरची घटना गंभीर स्वरूपाची असल्यामुळे बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांच्या मनामध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना मार्गदर्शन करून आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या.
सदर गुन्हयातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे तो फोन बंद करून तो पसार झाला होता. गुन्हयातील आरोपींच्या ठावठिकाणाबाबत गोपनिय बातमीदाराच्या मदतीने माहीती काढून आरोपीस शुक्रवार(दि. 21)रोजी ताब्यात घेवुन अटक केली. आरोपी बंटी उर्फ विक्रम मचाले, यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी इंदापुर न्यायालयासमोर समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपिला दिनांक मंगळवार (दि. 25) रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महेश उगले हे करीत आहेत.