इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.अनिल शिर्के तर उपाध्यक्ष पदी डॉ. रोहिदास थोरवे
सन २०२६ - २७ साठी

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.अनिल शिर्के तर उपाध्यक्ष पदी डॉ. रोहिदास थोरवे
सन २०२६ – २७ साठी
इंदापूर प्रतिनिधी –
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.सन २०२४-२५ वर्षा तील इंदापूर तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यानंतर सन २०२५ – २६ या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन आय एम ए च्या डॉ. नि. तू. मांडके सभागृहात करण्यात आले होते. असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रकिया पारदर्शीपणे संपन्न झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राम अरणकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी गतवर्षी केलेल्या लोकाभिमुख कार्यामुळे आयएमएच्या नावलौकिकात भर पडल्याचे पाहून डॉ. अनिल शिर्के यांना अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.
यावेळी इंदापूर आयएम ए उपाध्यक्षपदी डॉ. रोहिदास थोरवे, सेक्रेटरी पदी डॉ. सुधीर तांबिले, खजिनदार पदी डॉ. महेश रुपनवर यांची निवड करण्यात आली तर सन २०२६ – २७ साठी नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. अभिजीत ठोंबरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती डॉ. अरणकर यांनी दिली.
यावेळी डॉ.अरणकर व डॉ. पाणबुडे यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडून नूतन अध्यक्ष डॉ. शिर्के व कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून डॉक्टरांबरोबर अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान व ज्ञान पोहोचवणे, डॉक्टर व रुग्ण सुसंवाद वाढविणे, सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून रूग्णांना सेवा देणे, डॉक्टरांसाठी सार्वजनिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.
या माध्यमातून रक्तदान शिबिरे, सर्व रोग निदान शिबिरे, डॉक्टरांची कार्यशाळा, लसीकरण कॅम्प, नर्सिंग विद्यार्थ्यां साठी वर्कशॉप, पॅनल चर्चासत्र, जेष्ठ नागरिकां साठीचे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, अवयवदान कॅम्प, पालखीतील वारकऱ्यांसाठी रुग्ण तपासणी व औषध वाटप, रुग्ण आणि डॉक्टरांचा सुसंवाद कार्यशाळा, आपत्ती व्यवस्थापन, वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम इंदापूर तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. समीर मगर व डॉ. कल्पना खाडे, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. अतुल वणवे, डॉ. सुहास शेळके, डॉ. निखील धापटे, डॉ. अनिरुद्ध गार्डे, डॉ. लक्ष्मण सपकाळ यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.