
इंदापुरात उद्या नोकरी महोत्सवाचे आयोजन
तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश
इंदापूर –
इंदापूर तालुक्यातील व शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या (दि.13) डिसेंबर रोजी इंदापुरात प्रदीप गारटकरांच्या प्रयत्नातून नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील लोणी देवकर आणि बारामती औद्योगिक क्षेत्रातील विविध मानांकित उद्योग कंपन्यांमध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळावी, रोजगार वाढावा आणि स्थानिक कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या हेतूने या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रविवारी इंदापूर शहरातील पडस्थळ रस्त्यावरील मूकबधिर शाळा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदीप गारटकर मित्र परिवाराने केले आहे.

विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांना या महोत्सवातून नोकरीची संधी मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातील गरजेनुसार उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. नामांकित कंपन्यांची उपस्थिती, औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश हा नोकरी महोत्सव आहे. अधिकाधिक युवक – युवतींनी उपस्थित राहून रोजगाराच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी केले.






