इंदापूर

इंदापुरात प्लॅस्टिकमुक्त शहर मोहीम

सर्वांनी पर्यावरणपूरक कागदी किंवा कापडी पिशव्या वापरणे आवश्यक आहे.

इंदापुरात प्लॅस्टिकमुक्त शहर मोहीम

सर्वांनी पर्यावरणपूरक कागदी किंवा कापडी पिशव्या वापरणे आवश्यक आहे.

इंदापूर, प्रतिनिधि

शहरात प्लॅस्टिकमुक्त इंदापूर या संकल्पनेवर आधारित विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत मुख्य रस्ते, परिसर, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणची दुकाने, पदपथालगत विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करत नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात आली.

यामध्ये पर्यावरणास घातक असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करून यापुढे दक्षता घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, पुणे सोलापूर महामार्गावरील विक्रेते यांची तपासणी करीत सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांकडून सर्व प्लॅस्टिकपिशव्या जमा करत यापुढेही कडक कारवाईचा इशारा देत परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत व्यापारी व स्थानिक नागरिकांना सूचना देण्यात आल्या.

या कारवाईत नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

मुख्याधिकारी रमेश ढगे म्हणाले, “सध्या प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्या वाढत आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लॅस्टिकचा वापर टाळून सर्वांनी पर्यावरणपूरक कागदी किंवा कापडी पिशव्या वापरणे आवश्यक आहे.

नगरपरिषदेने याअंतर्गत व्यापारी व नागरिकांना पुन्हा पुन्हा सूचना करूनही जर नियम पाळले गेले नाहीत, तर कारवाई करण्यात येणार आहे.”

अतिक्रमण करणाऱ्यांनाही इशारा..

प्लॅस्टिक वापराबाबत दुकानांची तपासणी करत असताना अतिक्रमणामुळे ज्या भागात नागरिकांना चालण्यास किंवा वावरण्यास अडथळे निर्माण होत आहेत, अशा भागांतील विक्रेत्यांना स्वतः हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले. असे न केल्यास आगामी काळात कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Back to top button