इंदापुर मध्ये सर्पदंश जनजागरण शिबिर संपन्न
शेकडो आशा सेविका झाल्या सहभागी
इंदापूर : प्रतिनिधी
सर्पदंश हा गंभीर अपघात असून काळजी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो.सर्पदंश झाल्यावर योग्य प्रथमोपचार करून तातडीने उपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होते असे सर्पदंशतज्ञ डॉ.सदानंद राऊत यांनी सांगितले.ते इंदापूर येथे आयोजित सर्पदंश जनजागरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी बुधवारी (दि.४) बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,नाग व मण्यार ने दंश केल्यास मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊन रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो व काही मिनिटात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे तातडीने उपचार करणे अतिशय गरजेचे असते.घोणस व फुरसे या विषारी सापांनी दंश केल्यास दंशाच्या ठिकाणी तीव्र वेदना होऊन सूज येते,फोड येतात,रक्तदाब कमी होतो व रक्तश्राव होतो व रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी होऊ शकतात.सध्या जुन्नर,आंबेगाव तालुक्यात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असून शून्य सर्पदंश प्रकल्प संपूर्ण पुणे जिल्हात राबविणार असल्याचे डॉ.सदानंद राऊत म्हणाले.डॉ.पल्लवी राऊत यांनी सर्पदंश होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी , सर्पदंश झाल्यानंतरचे प्रथमोपचार,लक्षणे व उपचार याविषयी सविस्तर माहिती चित्रफितीद्व्यारे दिली.तसेच शून्य सर्पदंश प्रकल्प हा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्यअधिकारी डॉ,जीवन सरतापे,तालुका पर्यवेक्षक अशोक कमळे,बी.सी.एम.राणी वणवे,सर्व गटप्रवर्तक,निकिता दानी व इंदापूर तालुक्यातील २०० हुन अधिक आशा सेविका उपस्थित होत्या.
सध्या भारत सरकारच्या अंतर्गत आय.सी. एम.आर भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद – स्वास्थ्य अनुसंधान (ICMR-DHR) बहुकेंद्रिय टास्क फोर्सच्या वतीने सर्पदंशावर संशोधन प्रकल्प राबिवण्यात येत आहे .यामध्ये भारतातील सर्पदंशामुळे होणाऱ्या घटना, मृत्यू, दुष्परिणाम आणि आर्थिक भार याचा अंदाज बांधण्यासाठी राष्ट्रव्यापी अभ्यास करण्यात येणार आहे,अशी माहिती या प्रकल्पाचे पुणे जिल्हा सहसंशोधक जागतिक सर्पदंश तज्ञ व जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्पदंश तज्ञ समितीचे सदस्य डॉ.सदानंद राऊत यांनी दिली.
जगामध्ये दरवर्षी सर्पदंशाने एक ते दीड लाख लोकांचा मृत्यू होतो व चार लाखांपेक्षा जास्त लोकांना कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येते. जगाच्या तुलनेत भारतामध्ये दरवर्षी पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो.ही आकडेवारी याहून अधिक असण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारतातील महाराष्ट्रासह तेरा राज्यात हा संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ.राऊत यांनी दिली.या कार्यक्रमाची सुरुवात आशा सेविका यांच्या प्रशिक्षणाने झाली.तालुका वैद्यकीय अधिकारी जीवन सरतापे यांनी आभार मानले.