
इंदापुर येथे भरदिवसा घरफोड्या
घागरगाव, लोणी देवकर, पळसदेव येथून लाखोंचा ऐवज लंपास
इंदापूर; प्रतिनिधी
तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील घागरगाव, लोणी देवकर आणि पळसदेव या तीन गावांमध्ये मागील दोन दिवसांत भरदिवसा झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये भर दुपारी झालेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पुणे- सोलापूर महामार्गावरील पळसदेव येथे सोमवारी (दि.16) भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी 6 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपासकेला. यामध्ये पळसदेव येथील मत्रेवस्तीत मारुती वामन खोत यांच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील कपाट आणि डबे उचकून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मिळून सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला, तर घागरगाव आणि लोणी देवकर या दोन गावांमध्येही मंगळवारी (दि.17) भर दिवसा घरफोडीच्या घटना घडल्या असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे संबंधित घरफोड्यांमध्ये किती मुद्देमाल चोरीस गेला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकले नाही. घरफोडी झाल्याच्या घटनांना इंदापूर पोलिसांनी दुजोरा दिला आहे आणि तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.