इंदापूरचा आकाश निनादला! गोविंदांच्या पराक्रमाने साजरा झाला भव्यदिव्य दहीहंडी उत्सव
गोविंदा पथकाला 10,000 रुपये रोख

इंदापूरचा आकाश निनादला! गोविंदांच्या पराक्रमाने साजरा झाला भव्यदिव्य दहीहंडी उत्सव
गोविंदा पथकाला 10,000 रुपये रोख
इंदापूर, प्रतिनिधि
लोकनेते प्रदिपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी इंदापूर प्रशासकीय भवनासमोरील 100 फुटी रस्त्यावर रात्री 7:00 ते 11:30 या वेळेत जल्लोषात साजरा झाला.
या भव्यदिव्य सोहळ्याने इंदापूर तालुका आणि शहर परिसरातील गोविंदांच्या साहस, एकता आणि कौशल्याचा गौरवपूर्ण उत्सव सादर केला.
या उत्सवात तिरंगा दहीहंडी गोविंदा पथक, इंद्रेश्वर दहीहंडी गोविंदा पथक, वीर श्री मालोजीराजे दहीहंडी गोविंदा पथक, व्यंकटेश दहीहंडी गोविंदा पथक, महात्मा फुले दहीहंडी गोविंदा पथक, स्वराज्य दहीहंडी गोविंदा पथक (शिरसोडी) यांसारख्या नामांकित पथकांनी सहभाग घेतला. या पथकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाल्या दिनांक 16 ऑगस्ट 2025 पासून पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील दहीहंड्या फोडून इंदापूर तालुक्याची मान उंचावली आहे.
उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती.
उत्सवाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि श्रीकृष्ण मूर्तीच्या पूजनाने झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. प्रदिपदादा गारटकर, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुरेखा कुर्ची यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नृत्यांगना नमिता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकले.
आरजे अक्षय आणि संतोष नरुटे यांनी आपल्या रंगतदार समालोचनाने कार्यक्रमात जान आणली.
गोविंदांचा पराक्रम आणि सन्मान.
सहभागी प्रत्येक गोविंदा पथकाला 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. व्यंकटेश दहीहंडी गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देत सर्वांचे लक्ष वेधले, विशेषत: सर्वात वरच्या थरावर असलेली मुलगी या उत्सवाचे आकर्षण ठरली. स्वराज्य दहीहंडी गोविंदा पथकाने देखील 7 थरांची उभारणी करत दहीहंडीला बांधलेली फुले हातात घेतली, ज्यामुळे त्यांना विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्या पथकाला 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
“गोपाळ कृष्ण की जय, बजरंग बली की जय, भारतमाता की जय” अशा घोषणांनी इंदापूरचा आकाश दुमदुमून गेला. गोविंदांच्या पराक्रमाने आणि उपस्थित जनसमुदायाच्या उत्साहाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत, अनिकेत वाघ, अतुल शेटे पाटील, दादा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आशू गानबोटे, सुधाकर ढगे, तशू शेख, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अमर लेंढवे, महेश जठार, रोहित ठोंबरे, युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख, शुभम मखरे, रमेशआबा शिंदे, भरत देशमाने यांचे मोलाचे योगदान लाभले.
इंदापूरच्या भव्य दहीहंडी उत्सवाने गोविंदांच्या साहस आणि सामर्थ्याचा जागर करत परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम सादर केला. हा उत्सव इंदापूर तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि सामाजिक एकतेचा देदीप्यमान पुरावा ठरला.