इंदापूरचे आजी-माजी मंत्री एकाच व्यासपीठावर
पत्रकार सन्मान सोहळ्यास लावली हजेरी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूरचे आमदार तथा महाराष्ट्राचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील हे रविवारी ( दि.२९ ) इंदापूर तालुक्यातील मौजे जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यावेळी एकाच व्यासपीठावर पहावयास मिळाले.
इंदापूर तालुक्याच्या राजकारणात कायमच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सर्वसामान्य जनतेस पहावयास मिळत असतात.मात्र कधी एकमेकांकडे न पाहणारे हे राजकीय प्रतिस्पर्धी एका व्यासपीठावर आल्यावर ते काय बोलतात हे उपस्थितांना प्रश्न पडला होता.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जिथे जिथे अन्याय होतो तिथे अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात, सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम पत्रकारांच्या माध्यमातून झालं पाहिजे. कोरोनाच्या काळात ज्या पत्रकारांचा मृत्यु झाला असेल किंवा पत्रकारांच्या निगडित जे काही प्रश्न व अडचणी असतील त्यासंदर्भात शासन पत्रकारांच्या मागे खंबीरपणे उभे राहील.
तसेच याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पत्रकारांनी कोरोना काळातील सर्व समस्या जनतेसमोर मांडल्या त्याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जे काही प्रश्न असतील ते प्रभावीपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता स्पष्टपणे मांडण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी. शासन दरबारी पत्रकारांचे काही प्रश्न आहेत.सरकारचे मंत्री येथे उपस्थित असल्याने ते बघतील सध्या आम्ही विश्रांती घेतोय.त्यांना काही अडचणी आल्यास आम्ही दिल्लीतून सोडवू.टोलनाक्यावर पत्रकारांना पास नसल्याने अडवतात तर आपल्या राज्यमंत्र्यांचं नाव सांगा बांधकाम खाते त्यांचाकडेच आहे असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला.या काळात घरच्यांचा जीव टांगणीला लावून फिल्डवर काम करताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात काही पत्रकारांना जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे पत्रकारांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा या उद्देशाने इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.