इंदापूरात चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा – तब्बल २२ गुन्ह्यांची उकल…
१३ विहिरीवरील मोटारी, ३ सोलर प्लेट्स आणि ५ शेळ्या-बोकडांचा समावेश आहे.

इंदापूरात चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा — तब्बल २२ गुन्ह्यांची उकल
१३ विहिरीवरील मोटारी, ३ सोलर प्लेट्स आणि ५ शेळ्या-बोकडांचा समावेश आहे.
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जबरी चोरीच्या तपासातून मोठ्या चोरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वडापुरी गावाजवळील वरकुटे खुर्द रस्त्यावर १० जुलै रोजी दोन कामगारांना चाकूचा धाक दाखवत २८ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी खंडू उर्फ राहुल महाजन आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे.
चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे, साहिल चौधरी आणि रोहित कटाळे या अन्य तीन आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने मागील दोन वर्षांत इंदापूर परिसरात तब्बल २२ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
चोरी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १३ विहिरीवरील मोटारी, ३ सोलर प्लेट्स आणि ५ शेळ्या-बोकडांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळत ३३,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या पथकाने केली. गुन्हे शोध पथकातील जवानांनी सततच्या प्रयत्नांतून हा गुन्हा उघडकीस आणला.