इंदापूर क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलला ; राज्यामध्ये आदर्श संकुल निर्माण करण्याचा मानस
युवा पिढीसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
इंदापूर क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलला ; राज्यामध्ये आदर्श संकुल निर्माण करण्याचा मानस
युवा पिढीसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
ग्रामीण भागात खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा,आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत,सर्वसामान्य माणसांचे आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. त्यानुसार इंदापूर मध्ये इंदापूर तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आलेली आहे.
इंदापूर तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलला असून आत्तापर्यंत क्रीडा संकुलामध्ये मैदानाची साफसफाई, मैदानाची दुरुस्ती, सपाटीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग व्यवस्था, संपूर्ण सौर ऊर्जेवर आधारित विद्युतीकरण, रंगरंगोटी इत्यादी कामे पूर्ण झालेले आहेत.त्यामुळे इंदापूर क्रीडा संकुल जिल्ह्यांमध्ये एक आदर्श क्रीडासंकुल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
इंदापूर तालुक्यांमध्ये क्रिकेट या खेळाची लोकप्रियता लक्षात घेता क्रिकेट टर्फ पिच पूर्ण होत आहे. शासनाच्या क्रीडा संकुलामध्ये प्रथमच क्रिकेट पिच बनवले आहे. यामुळे शहरातील तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना तंत्रशुद्ध आधुनिक प्रशिक्षण देता येणार आहे.तसेच क्रीडा संकुलामध्ये जलतरण तलाव,वस्तीगृह, बास्केटबॉल, स्केटींग रिंक ची कामे वर्षभरात पूर्ण करून राज्यांमध्ये आदर्श संकुल निर्माण करण्याचा मानस असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी सांगितले.
नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे विविध खेळांच्या स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा संकुल नव्या स्वरूपात सज्ज असून परिसरातील विकास कामांमध्ये वृक्षारोपणासह सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.