अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी याकरिता महामार्ग पोलिसांकडून मृत्युंजय दूत अभियानास सुरुवात
अभियानाच्या माध्यमातून अनेक अपघातग्रस्तांचे वाचणार जीव

अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी याकरिता महामार्ग पोलिसांकडून मृत्युंजय दूत अभियानास सुरुवात
अभियानाच्या माध्यमातून अनेक अपघातग्रस्तांचे वाचणार जीव
इंदापूर : प्रतिनिधी
रस्ते अपघात झाल्यानंतर वेळेत मदत व औषधोपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.त्यामुळे सदरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत अभियान आज (दि.१) मार्च पासून राबविले जात असून सदरील अभियानाचा प्रारंभ महामार्ग पोलीस केंद्र इंदापूर यांच्या कडून छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉटेल स्वामीराज सरडेवाडी येथे करण्यात आला.
देशात प्रत्येक वर्षी जवळजवळ दीड लाख निष्पाप लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो तर साधारणतः ४ ते ५ लाख नागरिक अपघातात गंभीर जखमी होतात.काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येऊन सर्व काही उध्वस्त होते. त्यामुळे या संकल्पनेच्या माध्यमातून रस्ते अपघातग्रस्तांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यासाठी मदत होणार असून हायवे मृत्युंजय दूत योजनेची जबाबदारी महामार्ग पोलिसांकडे आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर म्हणाले की, महाराष्ट्राचा विचार केला तर दरवर्षी सरासरी १५ हजाराच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक पुणे परिक्षेत्र संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवित आहोत. प्रत्येक वर्षी वाहतूक सप्ताह सात दिवसांचा असतो परंतु या वर्षी एक महिन्यापर्यंत अपघाताचे प्रमाण कसे कमी होईल या दृष्टिकोनातून प्रबोधन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रेणीक शहा म्हणाले की,तुम्ही सर्व देवदूत या माध्यमातून काम करणार आहात.त्यामुळे तुम्हा सर्वाना पुण्य कमवण्याची संधी आहे. या महामार्गावर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये अशा पद्धतीने हे अभियान राबवुन हे पुण्याचं काम सदैव सुरू रहावं.
यावेळी डॉ.राजकुमार शहा यांनी प्रथम उपचारासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरविंद आर्किले,डॉ.महेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई सय्यद,नगरसेवक प्रशांत शिताप,आबासाहेब पाटील,पो.ना विनोद मिसाळ,पो.ह कदम,पो.ह आहेर,पो.ह कुंभार,पो.ह काळे यांसह महामार्ग पोलीस अधिकारी व टोल नाक्यावरील कर्मचारी उपस्थित होते.