इंदापूर नगरपरिषदेने उभारलेल्या जैवविविधता उद्यानाचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते उद्घाटन
हरित इंदापूर संकल्पनेतून पार्कची निर्मिती
इंदापूर नगरपरिषदेने उभारलेल्या जैवविविधता उद्यानाचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते उद्घाटन
हरित इंदापूर संकल्पनेतून पार्कची निर्मिती
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत हरित इंदापूर संकल्पनेतून इंदापूर नगर परिषदेने बायोडायव्हर्सिटी पार्कची निर्मिती केली आहे. इंदापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा आज वाढदिवस होता.यानिमित्ताने त्यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करून बायोडायव्हर्सिटी पार्कचे (जैवविविधता उद्यानाचे) उद्घाटन करण्यात आले.
नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेवकांनी इंदापूर शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ नागरिकांमध्ये रुजविली आहे. राष्ट्रीय पातळीवर शहर स्वच्छतेचे मानांकन इंदापूर नगरपरिषदेने सलग तीन वर्ष संपादन केले असून महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत इंदापूर नगरपालिकेने लोकसहभागातून हरित इंदापूरसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. तसेच भार्गव तलाव परिसरात इंदापूर नगरपालिकेने 5000 वृक्ष लागवड केली असून आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह शेजारील परिसरात नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन करून या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी नगराध्यक्षा झाल्यानंतर सुरुवातीस आपला वाढदिवस कचरा डेपो येथे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासमवेत साजरा केला होता. गतवर्षी त्यांनी भार्गव तलाव परिसरात उभारलेल्या अटल घन (ऑक्सीजन पार्क )या ठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी व उपस्थित नागरिकांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी बोलताना अंकिता शहा म्हणाल्या की,’ पर्यावरण संवर्धनासाठी सजावटीच्या माध्यमातून या परिसरात एक संकल्पना साकारली जाणार असून त्यातून नागरिकांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धन जोपासण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे.शहराच्या नैसर्गिक सौंदर्य वृद्धीसाठी जैवविविधता उद्यानाची निर्मिती केली असून हरित इंदापूर ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धन करून शहराचे वैभव वाढवावे.’
डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की,’ बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये हिरडा, बेहडा, आवळा, तुळस, अश्वगंधा, अडुळसा, शतावरी, कोरफड, चंदन,पर्णकुटी, गवती चहा, मारवा यासारख्या देशी 205 वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. या पार्कच्या माध्यमातून वेगवेगळे कीटक, पक्षी आकर्षिले जाऊन जैवविविधता वाढीस लागेल. इतर प्राण्यांच्या पासून संरक्षण व्हावे यासाठी या परिसराला कुंपण केले जाणार आहे.’
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, जावेद शेख, सागर गाणबोटे, हमीद आतार तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.