इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी बोलवली अतितात्काळ बैठक
बैठकीच्या पाच दिवसानंतर ठोस निर्णय होणार
इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी बोलवली अतितात्काळ बैठक
बैठकीच्या पाच दिवसानंतर ठोस निर्णय होणार
इंदापूर : प्रतिनिधी
उपमख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.१५) मंत्रालयात अतितत्काळ बैठक बोलावली असून कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सदरच्या बैठकीस नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव,सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा),नगरपालिका प्रशासन संचालक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा (व्ही.सी.द्वारे), इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (व्ही.सी.द्वारे),राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व अन्य सर्व संबंधित अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.तसेच बैठक झाल्यानंतर इतिवृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेसाठी पाच दिवसात सा. प्र. वि.च्या शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०१८/१२५/प्र. क्र.२२/का – १८ (र. व.का) दि.४ जून २०१९ मधील नमूद निर्देशाप्रमाणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंदापूर नगरपरिषदेत कामावर असताना मृत्यू झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी अनुकंपा तत्वानुसार कामावर घेण्यासाठी तसेच जे कर्मचारी काही त्रुटींमुळे अनियमित आहेत त्यांनी अनेक वर्षांपासून नगर परिषदेकडे व संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी इंदापूर नगरपरिषदे समोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मध्यस्थी करून सदरील आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले होते.त्यानुसार सदरील बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.