इंदापूर नगरपालिकेकडून शहर विकासासाठी 80 कोटींपेक्षा अधिकची विकास कामे- अंकिता शहा
नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके
इंदापूर नगरपालिकेकडून शहर विकासासाठी 80 कोटींपेक्षा अधिकची विकास कामे- अंकिता शहा
नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके
इंदापूर: सिद्धार्थ मखरे (प्रतिनिधी)
इंदापूर नगरपालिकेकडून शहर विकासासाठी 80 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीची विकास कामे झाली असून, सध्या अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. नगरपालिकेला थ्री स्टार सिटी म्हणून मानांकन मिळाले आहे, अशी माहिती इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी दिली.
अंकिता शहा पुढे म्हणाल्या,’ माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावरती निधी प्राप्त झाला आहे. त्यातून अनेक विकास कामे झालेली आहेत. नगरोत्थान, दलितेत्तर वस्ती योजना रस्ता अनुदान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लाख, सुसज्ज प्रशासकीय नूतन इमारत 5 कोटी, 102 गाळ्यांचे नुतन शॉपिंग सेंटर 6 कोटी 10 लाख, इंदापूर शहराकरिता सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना 35 कोटी आदी 80 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे पूर्णत्वास आली आहेत.
नगरपरिषदेने लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ उभी करून स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत 2018, 2019, 2020 असे सलग तीन वर्ष उत्कृष्ट कार्य केल्याने राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिकांनी नगरपालिकेला सन्मानित करण्यात आले असून, 20 कोटी रुपयांचे बक्षीसही नगरपालिकेस जाहीर झालेले आहे.नगरपरिषदेने नागरिकांच्या सहभागाने राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी केली असून इंदापूर शहरासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान, माझी वसुंधरा तसेच अनेक शासकीय योजना आणि उपक्रम यशस्वीपणे राबवून स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर आणि हरित इंदापूर ही संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. यामुळे इंदापूर शहराचा राज्यात विकासात्मक असा चेहरा निर्माण झाला आहे, असे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्पष्ट केले.