इंदापूर पोलिसांची धडक कारवाई ; सियाज कारसह १५ मोटार सायकली केल्या हस्तगत
चार जणांना ठोकल्या बेड्या
इंदापूर पोलिसांची धडक कारवाई ; सियाज कारसह १५ मोटार सायकली केल्या हस्तगत
चार जणांना ठोकल्या बेड्या
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटीत घरफोडी करून अंगणातील चार चाकी गाडी चोरीला गेल्याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीला गेलेली सियाज कार व अन्य चोरीच्या गुन्ह्यातील १५ मोटासायकली असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर हकीकत अशी की,इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी येथील स्वप्नील नाझरकर यांच्या घरी दि.१८ मे च्या सायंकाळी सहा ते १९ मे च्या सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करत अंगणातील सियाज कार (एम.एच ४२ बीबी २६३०) सह एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. सदरील गुन्ह्याबाबत पोलिसांनी तत्परता दाखवत सूत्रे फिरवली व चार दिवसांच्या आत दोन आरोपींना मुंबई येथून अटक करून सियाज गाडी ताब्यात घेतली होती. सदर आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपींनी इंदापूर शहर व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून घरफोडी व मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले.आरोपींच्या घराची झडती घेतली असता गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर गुन्ह्यातील वेगवेगळ्या कंपनींच्या १५ मोटार सायकली असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच सदरील गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी दिली.
इंदापूर पोलिसांकडून आवाहन
इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणाच्या दुकाना अथवा घराच्या शेजारी आंब्याच्या किंवा इतर व्यवसायासाठी कोणी व्यक्ती भाडेकरू म्हणून राहत असेल तर त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी.तसेच ज्या नागरिकांच्या मोटार सायकली चोरीला गेल्या आहेत अशांनी गाडीची कागदपत्रे घेऊन येऊन गाडीबाबत खात्री करावी.तसेच आरोपींच्या माध्यमातून ग्रामीण भागात चोरीच्या बऱ्याच गाड्या विकत घेतल्या गेलेल्या आहेत. याबाबतची काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना द्यावी.माहिती देणार्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे आवाहन इंदापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस नाईक मोहम्मदअली मड्डी, पोलीस नाईक सलमान खान,पोलीस नाईक जगदीश चौधर, पोलीस नाईक बापू मोहिते, पोलीस नाईक अर्जुन नरळे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस हवालदार काशिनाथ नगराळे यांनी केली.