इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासाच्या आत लावला चोरीचा छडा
सर्व मुद्देमालासह कंन्टेनर घेतला ताब्यात

इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासाच्या आत लावला चोरीचा छडा
सर्व मुद्देमालासह कंन्टेनर घेतला ताब्यात
इंदापूर : प्रतिनिधी
रांजणगाव एमआयडीसी मधील व्हर्लपूल कंपनी येथून १२९ फ्रिज घेऊन पान्डेचेरी येथे पोहच करणे कामी निघालेला कंन्टेनर दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका जवळून अज्ञात चोरट्यांनी फरार केला होता.इंदापूर पोलिसात दाखल करण्यात आलेल्या कंन्टेनर चालक अरविंद कुमार सिंग, वय ३२ वर्षे,रा. बिसब्रापुर ता. कल्याणपुर जि.मतीहारी(बिहार)याच्या तक्रारीवरुन इंदापूर पोलिसांनी केवळ २४ तासात कंन्टेनर चोरीचा छडा लावला असून चोरीस गेलेला सर्व मुद्देमालासह कंन्टेनर ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे,की दि.२५ फेब्रुवारी रोजी रांजणगाव एमआयडीसी मधील व्हर्लपूल कंपनी येथून १२९ फ्रिज घेऊन पाँन्डेचेरी येथे पोहच करणे कामी चालक अरविंद कुमार सिंग हे लोढ केलेला कंन्टेनर (कंन्टेनर नंबर एन .एल,०१ ए.ए ५१७०) निघाले होते.चालकाची तब्बेत बिघडल्याने दि.२५ व २६ रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्या जवळ त्यांनी वाहन बाजूस लावून आराम केला. त्यानंतर दि.२७ रोजी पुढील प्रवास सुरू केला. अंदाजे सकाळी साडेआठ च्या दरम्यान टोलनाक्यापासुन तीन ते चार किलोमिटर अंतरावर गेल्यानंतर चालक प्रातविधीसाठी कन्टेनरमधुन खाली उतरला. यावेळी चालकाचा मोबाईल व कन्टेनरची चावी वाहनातच राहिली.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फ्रिज सह भरलेला अख्खा कन्टेनरच पळवला.
चालकाने कन्टेनर चोरीचा प्रकार मॅनेजर ज्ञानेश्वर निटूरे यांना कळविला व याबाबत इंटापूर पोलीस ठाण्यामध्ये १२९ फ्रिज सह सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १६ लाख ८६,०५०/- रू. किमतीचे मालाच्या चोरीबाबत तक्रार दाखल केली.इंदापूर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते व उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सदरचा गुन्हा तपास कामी वेगाने चक्रे फिरवली. स.पो.निरिक्षक अजित जाधव, पोलीस हवालदार दिपक पालके, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक काशिनाथ नगराळे, पोलीस कॉन्सटेबल विनोद मोरे, अर्जुन भालसिंग व संजय कोठावळे तसेच तांत्रिक मदतीकामी पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड यांचे विशेष पथक तैनात केले. सदर पथक सोलापूर, उस्मानाबाद, लातुर जिल्ह्यात तपासकामी रवाना केले. अज्ञात चोरटे व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेत असताना बार्शी ते लातुर महामार्गावरील कुसळंब टोलनाक्याचे पुढे काही अंतरावर चोरीस गेलेला कन्टेनर ९९ फ्रिजसह या पथकाला मिळून आला. तर कन्टेनर मधील ३१ फ्रिज जे चोरट्याने चोरून नेले ते परभणी पोलीसांना नाकाबंदी दरम्यान मिळुन आले.
सदरच्या चोरी करणारे आरोपींबाबत माहीती मिळविण्यात इंदापूर पोलीसांना यश आले असून लवकरात लवकर त्यांच्याही मुस्क्या आवळल्या जातील व त्यांनी इंदापूर परीसरात अथवा जिल्ह्यातील हायवे रोडवर अशा प्रकारच्या आणखीन चोऱ्या केल्या आहेत का ? अगर कसे याबाबत सायबर शाखा पुणे ग्रामीण यांची तांत्रिक मदत घेऊन सखोल तपास सुरू असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.