इंदापूर महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले स्वागत
विद्यार्थ्यांशी साधला संवाद

इंदापूर महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले स्वागत
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याकारणाने गेली दीड वर्ष महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती मात्र सोमवारी ( दि.११ ) कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले, व त्यांच्याशी संवाद साधला.
छोटेखानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये कोरोनाने जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कोरोना योद्ध्यांचे देखील यावेळी कौतुक करण्यात आले.
प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ तब्बल दीड वर्षानंतर शिक्षणाचे द्वार आपल्यासाठी खुले झाल्याने सुरुवातीला सर्वांचे स्वागत. गेली दीड वर्ष कोविडमुळे शासनाच्या नियमाप्रमाणे महाविद्यालय बंद होती. सरकारने महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दीड वर्षात शिक्षणामध्ये अंतर पडले आहे. शिक्षणासंदर्भात परस्पर संवाद उपलब्ध होऊ शकले नाही. हे सर्व अंतर आपल्याला आता भरून काढावे लागणार आहे. गुणात्मक शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. नवीन पिढी घडवण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे. सर्वांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. वाचन, हस्ताक्षर चांगले पाहिजे तसेच सुसंवाद सादरीकरणासाठी आपण प्रयत्नशील असावे. अष्टावधानी असले पाहिजे. कोणताही एक खेळ आपण दररोज खेळायला पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छतेची कास धरली पाहिजे.खूप शिका मोठे व्हा, कुटुंबाचे तालुक्याचे समाजाचा नावलौकिक वाढवा.’
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा अनुभव आपण घेतला असून आज महाविद्यालय सुरू होत असून नियमित तासिका सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.औक्षण प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. मृदुल गायकवाड आणि प्रा. विद्या गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी मानले. आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.
यावेळी डॉ.सदाशिव उंबरदंड, डॉ. बाळासाहेब काळे, डॉ. राजाराम गावडे व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष वर्गातले शिक्षण उपलब्ध होणार असल्याचा आनंद यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवला.