इंदापूर महाविद्यालयात उर्दू लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू
8 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत उर्दू लिपी वर्गाचे प्रशिक्षण..

इंदापूर महाविद्यालयात उर्दू लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू
8 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत उर्दू लिपी वर्गाचे प्रशिक्षण..
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने उर्दू लिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. इंदापूर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने 8 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत उर्दू लिपी वर्गाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे उद्घाटन उर्दू प्रशिक्षक अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते म्हणाले की भाषा ही कोणत्या जाती धर्माची मक्तेदारी नसते. आपल्या देशात परकीय लोक ये-जा करत असतात. आपणही अनेक राज्यात जात असतो अशा प्रसंगी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक भाषा बोलता येणे गरजेचे असते. अनेक भाषा आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की, भाषा ही संप्रेशनाचे माध्यम आहे. उर्दू लिपी शिकणे अवघड बाब नाही. सराव केल्यास आपण उर्दू लिपीचे लेखन करू शकतो. वेगवेगळ्या भाषा विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर व मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी हिंदी आणि उर्दू भाषेचे महत्व व सहसंबंध समजावून सांगितले. कार्यक्रमाला प्रा. प्रतिभा जैन, डॉ. राजकुमार शेलार, प्रा. नम्रता निंबाळकर, प्रा. राजनंदिनी शिंदे उपस्थित होते. सदर उद्घाटन पर कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण वर्गाच्या समन्वयक व हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. एस. एन. पवार यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष नरूटे व विकास खराडे यांनी आभार मानले.