लांडोरीची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म ; देशातील पहिलीच घटना
पुण्यातील डॉ. सतीश पांडे यांच्या इला फाऊंडेशननं केला अनोखा प्रयोग

लांडोरीची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म ; देशातील पहिलीच घटना
पुण्यातील डॉ. सतीश पांडे यांच्या इला फाऊंडेशननं केला अनोखा प्रयोग
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या ठिकाणी लांडोरीची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.अशाप्रकारे लांडोरीच्या पिल्लांना जन्म देण्याची देशातील पहिलीच घटना घडली आहे.या अंड्यातून अवघ्या १६ दिवसांत पिल्लांनी जन्म घेतला आहे.
पिंगोरी येथील शेतकरी सुरेश शिंदे यांना त्यांच्या शेताच्या बांधावर लांडोरीची चार अंडी सापडली. त्यांनी त्वरित इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला याबाबत माहिती दिली. यावेळी तेथील अभ्यासक राहुल लोणकर, आविष्कार भुजबळ आणि राजकुमार पवार यांनी अंड्यांना सेंटरमध्ये आणून त्यांच्यासाठी कृत्रिम पेटी तयार केली. पिल्लांना जन्म घेण्यासाठी वेळेत योग्य अधिवास उपलब्ध झाल्याने अंड्यातून यशस्वीरीत्या चार पिल्लांनी जन्म घेतला. देशात प्रथमच मोरांच्या पिल्लांनी कृत्रिम अधिवासात जन्म घेतल्याचा दावा सेंटरचे संचालक डॉ. सतीश पांडे यांनी केला आहे.
प्रजनन काळात लांडोर हे शेताच्या बांधावर अंडी घालतात किंवा काटेरी वनस्पतींमध्ये नेहमी लपवतात हे सर्वानाच माहिती आहे.अधिवासाला धोका निर्माण झाल्यास लांडोर या अंड्यांना सोडून देतात. त्यामुळे अनेक वेळा अशी अंडी वाया जावून त्यातून जन्माला येणारी पिल्ले निघत नाहीत,वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोर हा पक्षी शेड्यूल एकमध्ये असल्याने मोर पाळणे, त्याला किंवा त्यांच्या अंड्यांना हाताळणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु वन विभागाच्या सहकार्याने ही अंडी कृत्रिम अधिवासात उबविण्यात आली आणि पिल्लांना जन्म देण्यात आला. सध्या या पिल्लांना योग्य आहार पुरविण्यात येत असून लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, असे डॉ. पांडे यांनी सांगितले.तसेच नागरिकांना मोराची अंडी सापडल्यास त्यांनी याबाबत सर्वप्रथम वनविभाग किंवा इला फाउंडेशनला कळवावे, असे आवाहन इला फाउंडेशनने केले आहे. अशा प्रकारे अंडी उबावल्याची घटना देशात कुठेच नाही, त्यामुळे इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे पांडे यांनी सांगितले.