इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर शहरामध्ये घरकुले बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल ५८८ घरकुले नुकतीच मंजूर झालेले आहेत.परंतू जागे अभावी ही घरकुले बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची एकत्रित बैठक घेत हा प्रश्न निकाली लावला आहे.
सदरील बैठकीमध्ये गट नंबर १५७/३ मधील एकूण ०१ हेक्टर क्षेत्रा पैकी ०.९० आर इतके क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले बांधण्यासाठी हस्तांतरित करण्यात आले आहे.सदरच्या जागा हस्तांतरणाचे पत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे हस्ते इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे व शहर स्तरीय तांत्रिक कक्ष अभियंता प्रसाद देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या जागेवर तब्बल ५८८ घरकुले बांधण्यात येणार असून यामुळे इंदापूर शहरातील आर्थिक दुर्बल घटक व बेघर नागरिकांना खूप मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर शहरातील सामान्य नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ताबडतोब जागेचा प्रश्न मार्गी लावल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, अतुल शेटे-पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.