इंस्टाग्रामवरील मेसेजवरून जाब विचारणाऱ्याचा खून

अंथुर्णेतील आरोपी जेरबंद : गावात तणाव

इंस्टाग्रामवरील मेसेजवरून जाब विचारणाऱ्याचा खून

अंथुर्णेतील आरोपी जेरबंद : गावात तणाव

इंदापूर प्रतिनिधी –

मौजे अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील गावात सोशल मिडिया वादाचे भयाण रूप पाहायला मिळाले. इंस्टाग्रामवरील एका मेसेजवरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा रागाच्या भरात खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीस पोलिसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. सोशल मिडिया माध्यमातून वाद निर्माण होऊन थेट खुनापर्यंत गेलेल्या या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

३ मे २०२५ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अंथुर्णे गावातील आकाश मुशा चौगुले (वय २२) हा आपल्या आईसोबत नातेवाईक राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याच्या घरी गेला होता. आकाशच्या इंस्टाग्रामवर राजेश पवार याने आकाशच्या बहिणीचा फोटो मेसेजद्वारे पाठविला होता. याबाबत जाब विचारण्यासाठी आकाश आणि त्याची आई शांताबाई चौगुले हे पवार यांच्या घरी गेले. तिथे आकाशने तू माझ्या बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवरून मला का पाठवला? असा थेट जाब विचारला. या विचारणेमुळे रागाने संतप्त झालेल्या राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याने आकाशचा गळा दाबला व त्याला उचलून घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या मोठ्या दगडावर आपटले. त्यामुळे आकाश जागीच बेशुद्ध झाला. घटनेनंतर राजेश पवार घटनास्थळावरून पळून गेला. आकाशला गंभीर अवस्थेत देसाई हॉस्पिटल, लासुर्णे येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या गांभीर्यामुळे तात्काळ तीन वेगवेगळी शोध पथके तयार करून, आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी कडबनवाडी परिसरातील वन विभागाच्या हद्दीत लपून बसला आहे. त्या माहितीनुसार पोलिसांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला अटक केली. या घटनेबाबत मयत आकाश चौगुले यांची आई शांताबाई चौगुले यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Back to top button