इस्कॉन बारामतीत श्रीराम नवमी निमित्त दोन दिवसीय श्रवण महोत्सव उत्साहात संपन्न
प्रवचनामध्ये भरत महाराजांच्या निष्कलंक भक्तीचे अत्यंत प्रभावी वर्णन करण्यात आले.

इस्कॉन बारामतीत श्रीराम नवमी निमित्त दोन दिवसीय श्रवण महोत्सव उत्साहात संपन्न
प्रवचनामध्ये भरत महाराजांच्या निष्कलंक भक्तीचे अत्यंत प्रभावी वर्णन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
इस्कॉन बारामतीतर्फे आयोजित श्रीराम नवमी निमित्त दोन दिवसीय “श्रीराम कथा श्रवण महोत्सव” अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवामध्ये अध्यात्म, भक्ती आणि संस्कृती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.
या प्रसंगी प्रमुख वक्ते “श्रीमान नंद दुलाल प्रभुजी” यांनी श्रीरामांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी विचार सांगितले की, “भौतिक जग हे अशाश्वत असून आध्यात्मिक जग हे शाश्वत आहे”, आणि श्रीरामांचा वनवास हा केवळ दुःख नसून एक दिव्य साधना आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनप्रवास म्हणजे “ओंकाराचे साक्षात् रूप—अ, उ आणि म—ओम” ञओंकार – अ म्हणजे परमेश्वर, उ म्हणजे अंतरंगा शक्ती, म म्हणजे जीवात्मे – ओम.असा भाव त्यांनी सुंदररीत्या मांडला.
प्रवचनामध्ये भरत महाराजांच्या निष्कलंक भक्तीचे अत्यंत प्रभावी वर्णन करण्यात आले. “मी रामचंद्रांचा दास आहे हीच माझी संपत्ती आहे,” या भावनेने संपूर्ण वातावरण भारावून गेले. नम्रता, वैष्णव सेवा आणि भगवंतांप्रती अखंड श्रद्धा यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या वर्षीच्या महोत्सवात अनेक आकर्षक आणि भावपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे विशेष “अर्चाविग्रह, श्री श्री राधा गोविंद आणि मंदिर परिसराचे चित्रकूट पर्वताच्या थीमवर सुशोभीकरण” करण्यात आले होते, ज्यामुळे भक्तांना श्रीरामांच्या वनवासातील दिव्य लीला प्रत्यक्ष अनुभवल्याचा अनुभव मिळाला. तसेच “शबरीची कथा” अत्यंत कल्पकतेने सादर करण्यात आली, ज्यातून तिची अखंड भक्ती, सेवेतील सातत्य, प्रतीक्षा आणि श्रीरामांप्रती असलेले निष्काम प्रेम जिवंत झाले.
याशिवाय “महाभिषेक” आणि “महाआरती” यांचा भव्य सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. मंत्रोच्चार आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमात “बिभीषण शरणागती* या विषयावर आधारित नाटिका भावपूर्ण सादर करण्यात आली, ज्यातून शरणागतीचे तत्त्व प्रभावीपणे उलगडले. तसेच “बालगोपालांच्या नृत्य सादरीकरणाने” उपस्थितांचे मन जिंकले.
या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे “इस्कॉन बारामतीच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन”, ज्याद्वारे “सेवा, समर्पण आणि तंत्रज्ञानाचा संगम” साकारला गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी “महाप्रसादाचे आयोजन” करण्यात आले. या दोन दिवसांच्या महोत्सवाने बारामती परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले असून, सर्वांनी याचा मनःपूर्वक आनंद घेतला असे श्रीमान नंददुलाल प्रभुजी आणि मंदिर व्यवस्थापन समिती यांनी कळविले आहे.






