उजनी धरणाची शंभरच्या दिशेने वाटचाल
नदीकाठच्या गावांना इशारा ; भीमा नदीत 70 हजार क्यूसेकने विसर्ग

उजनी धरणाची शंभरच्या दिशेने वाटचाल
नदीकाठच्या गावांना इशारा ; भीमा नदीत 70 हजार क्यूसेकने विसर्ग
इंदापूर;प्रतिनिधि
पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९७.६८ टक्के पाणीसाठा झाला तर धरणात ५२ हजार १३७ क्युसेक्सने पाणी आवक होत आहे. धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू असताना धोकादायक पातळी नियंत्रणासाठी धरणामधून भीमा नदी पात्रात ७० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणात शनिवारी (ता. २६)
९५.३९ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्यात वाढ होऊ लागल्याने शुक्रवारपासूनच पहिल्या टप्प्यात पाच हजार क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. धरणातून नदीत सोडणाऱ्या विसर्गमध्ये सोमवारी वीस हजार क्यूसेकने वाढ करत एकूण ७० हजार क्युसेकने तसेच वीज निर्मितीसाठीचे १६०० क्यूसेक असे एकूण ७१ हजार ६०० क्युसेकने धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातील सोमवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजताची पाणीपातळी वाढली.
**उजनी धरणातून होणारा विसर्ग**
भीमा नदीतून विसर्ग – ७० हजार क्यूसेक
वीजनिर्मिती – १६०० क्युसेक
सीना माढा बोगदा – १८० क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन योजना – ८० क्युसेक
मोठा बोगदा – ४०० क्युसेक
मुख्य कालवा – ११०० क्युसेक
**दृष्टिक्षेपात**
एकूण पाणीपातळी : ३२८४.८७ दशलक्ष घनमीटर (११५.९९ टी एम सी)
उपयुक्त साठा : १४८२.०६ दशलक्ष घनमीटर (५२.३३ टी एम सी)
उजनी धरणातील पाण्याची आवक : ५२ हजार १३७ क्युसेक्स
उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू सध्या ७० हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. विशेषतः सखल भागातील संबंधित नागरिकांना योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
-रा. पो. मोरे (कार्यकारी
अभियंता), उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर