
उजनी धरणात सापडला जिताडा जातीचा मासा
माशाला लागली विक्रमी बोली
इंदापूर : प्रतिनिधी
‘ मासळीचा राजा ‘ म्हणून ओळखला जाणारा व मत्स्य खवय्यांसाठी हवाहवासा असणारा रायगड, अलिबाग परिसरातील सर्वात प्रसिद्ध जिताडा जातीचा मासा नुकताच उजनी जलाशयात सापडला असून या माशाला भिगवण मासळी बाजारात ३५० रुपये प्रतिकिलो असा विक्रमी भाव मिळाला आहे. भगवान महाडिक यांच्या बापूसाहेब फिश मार्केटवर आलेल्या या माशाला दत्तात्रय लोखंडे नावाच्या व्यापाऱ्याने तब्बल ३ हजार १५० रुपये इतकी बोली लावून हा मासा खरेदी केला.
रायगड जिल्ह्यात जिताडा सर्वात प्रसिद्ध मासा समजला जातो.या माशात प्रथिने व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात या कारणामुळे या माशाला खवय्यांकडून मोठी मागणी असते.
उजनी धरणामध्ये जिताडा कधी ही सापडत नाही मात्र गेल्या वर्षभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्याच्या भागांमध्ये मत्स्य शेती करणाऱ्यांच्या शेततलावातून ते मासे भीमा नदी पात्रामार्गे उजनी धरण क्षेत्रात आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.