स्थानिक

उद्या बारामती बंद नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले स्पष्ट

निष्पक्ष चौकशी करण्यात येईल

उद्या बारामती बंद नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले स्पष्ट

निष्पक्ष चौकशी करण्यात येईल

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदरणीय अजितदादा यांच्या अपघातासंदर्भात सर्व तपास यंत्रणांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, तसेच या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर मांडले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

तसेच आदरणीय रोहित दादा यांनी या प्रकरणात उभा केलेल्या ठाम आणि संयमी लढ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पुणे सीआयडीकडूनही या अपघातासंदर्भातील सर्व बाबींचा बारकाईने तपास करून सत्य परिस्थिती स्पष्ट केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उद्या दिनांक २८ फेब्रुवारी शनिवार रोजी पुकारण्यात आलेला बारामती बंद मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात येत आहे.

आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या आणि न्यायासाठी एकदिलाने उभ्या राहिलेल्या सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. विशेषतः बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांच्या अपघातासंदर्भात न्याय मिळावा यासाठी जो ठाम आणि शांततापूर्ण पाठिंबा नागरिकांनी दर्शविला, तो निश्चितच उल्लेखनीय आहे.

भविष्यात या प्रकरणाचा योग्य तो सोक्षमोक्ष लवकर लागला नाही, तर पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने आणि संघटितपणे लढा उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
न्यायासाठी सुरू असलेला हा लढा सत्य आणि पारदर्शकतेच्या मार्गानेच पुढे नेला जाईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

चौकट

बारामती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांची प्रत्येकवेळी उशिरा भूमिका जाहीर होत असल्याने हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते तसेच मंडईतील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे.

कोणताही निर्णय किंवा भूमिका वेळेवर जाहीर न झाल्यामुळे नियोजनात अडचणी निर्माण होतात. विशेषतः हॉटेल व्यवसाय आणि तरकारी विक्रीसारख्या दैनंदिन व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. सकाळीच भूमिका स्पष्ट न झाल्यास खरेदी-विक्री, साठा व्यवस्थापन आणि ग्राहक व्यवहार यामध्ये गोंधळ निर्माण होतो,असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

Back to top button