उपमुख्यमंत्री अजित पवारच्या राष्ट्रवादी ऑफिसमध्ये लावणीचा ठसका! महिला पदाधिकाऱ्याचा अदांवर सगळेच फिदा, VIDEO व्हायरल
महिला आणि पुरुष कार्यकर्ता दोघेही उपस्थित होते

उपमुख्यमंत्री अजित पवारच्या राष्ट्रवादी ऑफिसमध्ये लावणीचा ठसका! महिला पदाधिकाऱ्याचा अदांवर सगळेच फिदा, VIDEO व्हायरल
महिला आणि पुरुष कार्यकर्ता दोघेही उपस्थित होते
नागपूर;;प्रतिनिधि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूरच्या गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात झालेल्या लावणीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वेळातच कार्यक्रमातील लावणीचे दृश्य मोबाईलवर रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर पसरले आणि त्यानंतर या कार्यक्रमावर राजकीय चर्चांना उधाण आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना आणि नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी लावणीचे सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही तरुण कार्यकर्त्यांनी “वन्स मोर”च्या घोषणा दिल्यानंतर शिल्पा शाहीर यांनी पुन्हा एकदा सादरीकरण केले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ काही उपस्थितांनी मोबाईलवर टिपला आणि सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल झाला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसाडे यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेला होता. शिल्पा शाहीर या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी असून, त्यांनी पारंपरिक लावणी सादर केली. कार्यक्रमात महिला आणि पुरुष कार्यकर्ता दोघेही उपस्थित होते आणि हे सर्व एक पारिवारिक वातावरणात पार पडले.”
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, “लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. तिचा अवमान होऊ नये आणि तिचा चुकीचा अर्थ लावू नये. आम्ही दिवाळीचा उत्सव आनंदाने साजरा केला, मात्र काही जणांनी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.” दरम्यान, शिल्पा शाहीर या नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष असून, त्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाले असले तरी पक्षाने हा कार्यक्रम कौटुंबिक दिवाळी स्नेहमिलन” असल्याचे स्पष्ट केले आहे.






