आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण

शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण

शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती वार्तापत्र 

राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाच्या उत्पादनात वाढ करीत आहेत; अशा प्रगतशील तंत्रज्ञान आणि त्यामाध्यमातून कृषीक्षेत्रात होणाऱ्या बदलाविषयी इतर शेतकऱ्यांनीही माहिती घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण सन २०२५-२६ घटकाअंतर्गत निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ५१ लाभार्थ्यांना डि.बी.टी.द्वारे अनुदानावर ट्रॅक्टर व औजाराचे वितरण करण्यात आले.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक मंडळ, सभासद, विविध बँकेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे (एआय) निर्णयप्रक्रिया डेटाआधारित असल्यामुळे अचूक होते, पिकातील दोष लवकर ओळखता येतात , त्यामुळे पिकाला लागणारे घटकांबाबत वेळेत माहिती मिळते. वीज आणि पाणी वापरात बचत होते, शेतमालाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे, त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळानुरुप शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, याकरीता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ३२ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही राज्यातील विविध भागात पाऊस पडत असून अशा भागातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरु करण्यात आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याकरिता अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याकरिता कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर पुढची प्रक्रिया करून ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बारामती तालुक्यातील सुमारे २५ हजार लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर करण्यात आली असून यावर्षी ३५ कोटी रुपयाचे अनुदान करण्यात येणार आहेत. याप्रमाणे राज्यातही अनुदान वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ तसेच विविध योजनांकरिता ५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील विविध योजनेतील लाभार्थ्यांना सुमारे १ लाख कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या ३, ५ आणि ७.५ अश्वशक्ती असलेल्या कृषी पंपांसाठी वीज देयकाकरिता २५ हजार कोटी रुपये, पीएम-सन्मान निधी करिता ७.५ हजार कोटी रुपये, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ४५ हजार कोटी रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह अडीच हजार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह दीडहजार रुपये, ७५ वर्षांवरील नागरिक सर्व प्रकारच्या बसेसमध्ये १०० टक्के मोफत प्रवास, महिलांना बसेसमध्ये ५० टक्के सवलतीने प्रवास अशा विविध योजनांचा समावेश आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

*शेतकरीहिताचे निर्णय घेण्यावर राज्य शासनाचा भर-कृषीमंत्री*

श्री. भरणे म्हणाले, अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपये मदत करुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निर्णय घेतला आहे.

कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजारे मंजूर करुन त्यांचे वितरण करण्यात येत असून यामाध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होत आहे, एकूणच शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकरीहिताचे निर्णय घेण्यावर राज्यशासन भर देत आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

*जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये एकूण १ लाख ३१ हजार ९४८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे:*

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आंबेगाव ६ हजार ८७८, बारामती १६ हजार ४७०, भोर २ हजार २४८, दौंड १८ हजार ५०६, हवेली २ हजार ३७४, इंदापूर २३ हजार ५५०, जुन्नर ११ हजार १६७, खेड ५ हजार २०३, मावळ ६८१, मुळशी ४६३, पुणे शहर ५, पुरंदर ८ हजार ६११, शिरुर २४ हजार ७९६, वेल्हे ५५१ असे एकूण १ लाख २१ हजार ५०३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाअंतर्गत आंबेगाव १ हजार १७६, बारामती १ हजार ६७, भोर ४१२, दौंड ९५३, हवेली ४०३, इंदापूर १ हजार ३१, जुन्नर २ हजार २३९, खेड ९९८, मावळ २४४, मुळशी २५८, पुणे शहर १, पुरंदर ५८३, शिरुर ८७७, वेल्हे २०३ असे एकूण १० हजार ४४५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. पवार यांच्या हस्ते नवीन हार्वेस्टर आणि इनफिल्डरचे पूजन करण्यात आले.

Back to top button