स्थानिक

सोमेश्वर विजयानंतर राष्ट्रवादीकडून कृतज्ञता सोहळा!; बारामतीच्या कार्यकर्त्यांचा गौरव

घरोघरी प्रचार, घोंगडी बैठका अन् मतदारांशी थेट संवादातून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली; दिवंगत अजितदादांचे स्वप्न साकार केल्याची मान्यवरांची भावना

सोमेश्वर विजयानंतर राष्ट्रवादीकडून कृतज्ञता सोहळा!; बारामतीच्या कार्यकर्त्यांचा गौरव

घरोघरी प्रचार, घोंगडी बैठका अन् मतदारांशी थेट संवादातून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली; दिवंगत अजितदादांचे स्वप्न साकार केल्याची मान्यवरांची भावना

बारामती वार्तापत्र

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या बारामती शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांचा पक्षाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. शारदा प्रांगण येथील पक्ष कार्यालयात १३ तारखेला आयोजित या कार्यक्रमातून विजयासाठी योगदान देणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधणे, घोंगडी बैठका घेणे आणि पॅनलची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणे, अशा विविध माध्यमांतून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा यावेळी गौरव करण्यात आला. सोमेश्वरच्या विजयामागे कार्यकर्त्यांची एकजूट, नियोजनबद्ध प्रचार आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

शारदा प्रांगणात मान्यवरांची उपस्थिती

या सन्मान सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, नगराध्यक्ष सचिन सातव, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरोघरी प्रचार ते घोंगडी बैठका; कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा गौरव

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनलच्या उमेदवारांच्या विजयासाठी बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गट क्रमांक चारमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधणे, घोंगडी बैठका आयोजित करणे आणि विकासाचा विचार मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रचार मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांच्या योगदानाची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. निवडणुकीतील यशानंतर कार्यकर्त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साध्य करण्यात आला.

‘दिवंगत अजितदादांचे स्वप्न साकार केल्याचे समाधान’

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील विजय हा कार्यकर्त्यांची एकजूट, नियोजनबद्ध प्रचार आणि जनतेचा विश्वास यांचे फलित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजितदादांनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचे समाधानही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळविलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी काळातही दिवंगत अजितदादांच्या विचारांनुसार सहकार, विकास आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

माजी नगरसेवक संतोष गालींदे यांना श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या शेवटी बारामती नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष गालींदे यांना पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा गौरव, पक्षातील एकजुटीचे दर्शन आणि दिवंगत अजितदादांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम पार पडला.

Back to top button