उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर;येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर;येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून यंदापासून ‘बीएससी नर्सिंग’चा अभ्यासक्रम सुरु होत असल्याने बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात बारामती शैक्षणिक हब म्हणून विकासीत होत आहे.
कोविडपश्चात राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणीचाही प्रस्ताव होता.
त्यानुसार राज्यात बारामतीसह जळगाव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्री मंडळाने दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती.
त्यानुसार सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शंभर प्रवेश देण्यात येणार आहेत. बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होत आहे.
गेल्या काही वर्षात बारामती मेडीकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून दररोज किमान पाचशे ते सहाशे रुग्ण येथे औषधोपचार घेतात. आयुर्वेदीक महाविद्यालयाची चौथी बँच यंदापासून बारामतीत येणार आहे.
बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणे महत्वाचे ठरणार आहे. या मान्यतेमुळे बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी मान्यतेचा आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाचा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः नर्सिंगसारख्या सेवाभावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संधी मिळणार असून, आरोग्यसेवा क्षेत्रात नवे योगदान देणारे मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.