उपमुख्यमंत्री स्व:अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत वैद्यकीय मदतीची यंत्रणा विस्कळीत

उपमुख्यमंत्री स्व:अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत वैद्यकीय मदतीची यंत्रणा विस्कळीत
पूर्वीप्रमाणे वैद्यकीय मदत आणि शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा
बारामती वार्तापत्र
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील वैद्यकीय मदत व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना शासकीय योजना, सवलती व तातडीच्या उपचारांसाठी समन्वय साधून देणारी व्यवस्था सध्या प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अजित पवार यांच्या कार्यकाळात त्यांच्या कार्यालयामार्फत, तसेच त्यांच्या पीएच्या समन्वयातून बारामतीतील गोरगरिब रुग्णांना विविध रुग्णालयांमध्ये उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली जात होती. अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, औषधोपचार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते.
मात्र त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी अधिकृतपणे कोणाचीही नेमणूक करण्यात आली नसल्याने गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सध्या वैद्यकीय क्षेत्रात समन्वयाच्या अभावामुळे काही ठिकाणी चुकीची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच उपचारांसाठी अनावश्यक पैशांची मागणी किंवा प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.
बारामती हे आरोग्य सुविधांच्या दृष्टीने विकसित होत असलेले शहर असले तरी, प्रभावी मार्गदर्शन आणि पाठपुरावा करणारी व्यवस्था नसल्यास सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या पश्चात स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामतीतील वैद्यकीय प्रश्नांकडे लक्ष देऊन गरजू रुग्णांसाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. बारामतीकरांना पूर्वीप्रमाणे वैद्यकीय मदत आणि शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.






