उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी चे तलाठी महेश मेटे दहा हजार रुपये घेताना कॅमेऱ्यात कैद
नोंद करण्यास टाळाटाळ करणे आले अंगलट

उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी चे तलाठी महेश मेटे दहा हजार रुपये घेताना कॅमेऱ्यात कैद
नोंद करण्यास टाळाटाळ करणे आले अंगलट
बारामती वार्तापत्र
पूर्वी एक म्हण प्रचलित होती, जे नसेल ललाटी, ते करेल तलाठी, मात्र कायद्याने तलाठ्यांचे मर्यादित केलेले अधिकार पाहता अजूनही गावकामगार तलाठी आपल्या सजा (गांव ) मध्ये काम करत असताना सामान्य शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत आहेत याचे ज्वलंत उदाहरण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या काटेवाडी या गावी घडले आहे.
विहिरीची नोंद लावण्यासाठी विकास धायगुडे हे वारंवार गावकामगार तलाठी यांचे कार्यालयात हेलपाटे मारत होते मात्र या ना त्या कारणावरून तलाठी महेश मेटे हे नोंद करण्यास टाळाटाळ करत होते. धायगुडे यांनी तहसील कार्यालय येथे याविषयीची तक्रार केली होती तहसीलदारांनी नोंद करण्याचे आदेशही दिले होते. मात्र निर्ढावलेले तलाठी तहसीलदारांचे आदेश मानतील तरी कसे?
शेवटी धायगुडे यांनी कॅमेरा मध्ये शूटिंग करत तलाठी महेश मेटे यांना 10 हजार रुपये देतानाचा व्हिडिओ काढला आणि यामध्ये महेश मेटे व्हिडीओत कैद झाले. हा व्हिडीओ तहसीलदार, प्रांत ,जिल्हाधिकारी यांना पाठवून महेश मेटे यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी विकास धायगुडे तसेच सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी केली आहे.