उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत लॉकडाऊनचा फज्जा.
स्वत:ला पवारांचे निकटवर्ती म्हणवून घेणार्यांनी नियम बसविले धाब्यावर.

बारामती: आज बारामती हातावरचे पोट असणारे सलून व हॉटेल व्यवसायिक जागतिक कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सापडले आहेत. हे दोन्ही व्यवसायधारक आंदोलनाच्या पावित्रात असताना, उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत स्वत:ला पवारांचे निकटवर्ती म्हणवून घेणार्यांनीच जीम व जलतरण तलाव मोजक्याच लोकांना सुरू ठेवून सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले आहे.
बारामतीत वीर सावरकर जलतरण तलाव व अनंतराव हेल्थ क्लब सुरू ठेवून उपमुख्यमंत्र्यांच्याच बारामतीत लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे. माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत डॉक्टर व या दोन्ही संस्थेवरील सदस्यांनी विनापरवाना सदरचे जलतरण तलाव व व्यायामशाळा सुरू करून आम्ही ठरवू तीच पूर्व दिशा असे दाखवून दिले आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लॉकडाऊन काळात हातावरचे पोट असणार्यांची आर्थिक परिस्थिती दयनिय झाल्यामुळे या गर्भश्रीमंत असणार्या लोकांना जलतरण व व्यायामाचे पडलेले आहे. यापुर्वी या जलतरण तलावामध्ये चोरीचा प्रकार घडला होता. अद्यापही या चोरीबाबत उलघडा झालेला नाही. कानोसा घेतला असता तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार झालेला कळत आहे?
देशात व राज्यात सर्वत्र जलतरण तलाव व व्यायामशाळा बंद आहेत.
बारामतीत इतरही व्यायामशाळा आहे मात्र, त्यांची उपासमारीची वेळ आलेली असताना या बड्या लोकांनी मनमानी करीत जलतरण तलाव व व्यायामशाळा सुरू केल्याने इतर व्यायामशाळा सुरू करण्याबाबत नागरीकांतून मागणी होत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या गावात जर राजरोसपणे कोणाचाही विचार न करता सर्व नियम धाब्यावर ठेवून जलतरण तलाव व व्यायामशाळा सुरू ठेवत असतील तर उपमुख्यमंत्री या मनमानी कारभार करणार्यांवर कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष लागून आहे.