उपोषणाचा तिसरा दिवस; संभाजीराजेंची तब्येत बिघडली!
समन्वयक-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष
उपोषणाचा तिसरा दिवस; संभाजीराजेंची तब्येत बिघडली!
समन्वयक-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपतीयांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. संभाजीराजे यांच्या शरीरातील शुगरचं प्रमाण कमी झालंय. त्यांना अशक्तपणा, डोकेदुखीही जाणवतेय. कुठलीही औषधं घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिलाय. आणखी प्रकृती बिघडली तर रुग्णालयात दाखल करावं लागले असं डॉक्टरांनी सांगितलंय.
डॉक्टर म्हणाले की, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाइन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचं समजतंय.
दरम्यान 18 मराठा समन्वयक आणि 2 विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एकनाथ शिंदेंसह काही महत्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत 22 पैकी 5 मागण्या मान्य करून घ्याव्या असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
समन्वयकांनी तोडगा काढण्यासाठी कायदा हाती घेऊ नये. तिथे आवाजही चढवू नये असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. त्यामुळे आता चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलंय.