उमेद अभियानातून महिलांची भरारी; रणमर्दिनी महिला शेतकरी कंपनीच्या मका भरडा युनिटचे भूमिपूजन
अस्मिता महिला प्रभाग संघामार्फत अवजार बँकेचा शुभारंभ; २० गावांतील महिलांना रोजगाराच्या संधी

उमेद अभियानातून महिलांची भरारी; रणमर्दिनी महिला शेतकरी कंपनीच्या मका भरडा युनिटचे भूमिपूजन
अस्मिता महिला प्रभाग संघामार्फत अवजार बँकेचा शुभारंभ; २० गावांतील महिलांना रोजगाराच्या संधी
आदित्य बोराटे –
महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असून, उमेद अभियानामुळे मोलमजुरी करणाऱ्या महिलाही आज स्वतःची कंपनी उभारून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहेत. काही महिला ट्रॅक्टर चालवत शेतीकामात पुढाकार घेत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील अस्मिता महिला प्रभाग संघामार्फत स्थापन करण्यात आलेल्या रणमर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्या मका भरडा युनिटच्या प्लांटचे भूमिपूजन आणि अवजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले. इंदापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या शुभहस्ते या प्लांटच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसत असून, उमेद अभियानामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अस्मिता महिला प्रभाग संघाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे २० गावांतील महिलांना अवजार बँकेच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले, “पाठबळ मिळाल्यास महिला शेतकरी मोठी झेप घेऊ शकतात. ग्रामविकास विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांनी संधीच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत. सणसर येथील रणमर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी हे त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.”

या कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे, प्रभाग समन्वयक डी. जे. राऊत, ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, प्रभाग संघाच्या अध्यक्षा कोमल मोरे, कंपनीचे संचालक, सल्लागार, ग्रामसखी, लिपिका तसेच सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रणमर्दिनी महिला शेतकरी कंपनी आणि अस्मिता महिला प्रभाग संघाच्या पुढाकारातून सुरू झालेली अवजार बँक ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीपूरक उद्योग व स्वावलंबनाचा नवा मार्ग ठरणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.






