ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल – हर्षवर्धन पाटील
बारामती कृषी विज्ञान केंद्रास नीरा भीमा व कर्मयोगीचे संचालक व शेतकऱ्यांची भेट

ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल – हर्षवर्धन पाटील
-बारामती कृषी विज्ञान केंद्रास नीरा भीमा व कर्मयोगीचे संचालक व शेतकऱ्यांची भेट
इंदापूर प्रतिनिधी –
ऊस शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे 40 टक्के पर्यंत उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए. आय.) चा वापर क्रांतिकारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 8) काढले.
बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी यांचेसह भेट देऊन मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती अँग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेती प्रक्षेत्रास सकाळी भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भातील वार रूमला भेट देऊन या तंत्रज्ञानाने ऊस घेतलेल्या राज्यातील काही शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यानंतर दुपारी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सभागृहामध्ये या संदर्भात झालेल्या परिसंवादात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील प्रतिपादन केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रदादा पवार यांनी ए.आय. तंत्रज्ञान वापरून ऊसाचे पिक घेतल्याने कृषी विज्ञान केंद्राचे नाव जगात सर्वदूर पोहोचले आहेत. आता शेतकऱ्यांना ऊस शेती ही ए.आय. तंत्रज्ञानाने करावीच लागेल, त्याशिवाय शेतकरी तग धरू शकणार नाही. या तंत्रज्ञानामुळे कमी उत्पादन खर्चात, ऊस उत्पादनात मोठी वाढ होऊन क्रांती घडणार आहे.
ऊस शेतीला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी शेत तळे करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेततळे उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून, यासंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व संबंधितांशी माझे बोलणे झाले आहे. ऊस शेती मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापरा संदर्भात कर्मयोगी व निरा भिमा या कारखान्यांमध्ये नोडल अधिकारी नेमला जाईल, अशी माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचा अलीकडे ऊस पिकाच्या सुमारे 12 महिन्याच्या कालावधीतच ऊस तोडणी कडे कल आहे, त्यामुळे पिकाचा या कालावधीत जास्त टनेज व अधिक साखर उतारा वाढीसाठीचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या ऊस तज्ञांनी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे यांनी आर्टिफिशियल पद्धतीने ऊस शेतीची माहिती दिली. ऊस शेतीमधील क्रांतीकारक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवा. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत हे तंत्रज्ञान पोहचविले जात आहे. या पद्धतीने उसाचे एकरी 150 टन एवढे उत्पादन घेतले असून, आता एकरी 200 टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, असे डॉ. नलवडे यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विवेक भोईटे यांनी सांगितले की, राज्यात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुमारे 1000 शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर उसाचे पीक घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञान वापरासाठी शेतकऱ्यांना 2 एकरासाठी रु.12500 एवढा कमी खर्च येत आहे. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे तुषार जाधव, धीरज शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
_________________________
फोटो:बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ व शेतकऱ्यांसह भेट दिली.