एकांकिका स्पर्धेत ‘अल्पविराम ‘ ने मारली बाजी
35 वी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा उत्साहात संपन्न
एकांकिका स्पर्धेत ‘अल्पविराम ‘ ने मारली बाजी
35 वी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा उत्साहात संपन्न
बारामती वार्तापत्र
कोरोना कालावधीत राज्यातील सर्व नाट्यगृह बंद होती. मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली. महाराष्ट्रामध्ये नाट्य चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे. नाट्यगृह उघडल्यानंतर एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी नटराज ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरली आहे. ही बाब सर्व सहभागी संस्थानी आवर्जून बोलून दाखविली, तसेच आम्हाला तब्बल दहा महिन्यानंतर रंगमंचावर पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी दिल्या बद्दल सर्व सहभागी कलाकारांनी नटराजचे आभार मानले. राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत ही स्पर्धा यावर्षी पार पडल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
दरवर्षी नटराज करंडक हा १२ डिसेंम्बर ते १८ डिसेंम्बर आयोजित केला जातो परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ एकच दिवस ही स्पर्धा आयोजित केली होती. अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजन करून देखील यावर्षी ९ संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता
नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा शनिवार दि.१२ रोजी बारामती येथे पार पडल्या. संस्थेच्या वतीने गेली ३४ वर्षे सातत्याने एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी स्पर्धेचे हे सलग ३५ वे वर्ष होते.
स्पर्धेत स्नेहस्मित, तळेगाव दाभाडे ( एकांकिका – अल्पविराम) या संस्थेने प्रथम क्रमांकासह १०,००१ रूपयांचे रोख पारितोषीक व नटराज स्मृतीचिन्ह पटकाविले तर दुसरा क्रमांक आमचे आम्ही, पुणे (एकांकिका – लव्ह इन रिलेशनशिप) या संस्थेने ७००१ रुपयांचे पारितोषिक व नटराज स्मृतीचिन्ह पटकाविले, तिसऱ्या क्रमांक रंगपंढरी, पुणे (एकांकिका – बिनविरोध) या संस्थेने मिळवत ५००१ रुपयांचे पारितोषिक व नटराज स्मृतीचिन्ह पटकाविले.