एसटीची धुरा खाजगी चालकांकडे ; इंदापूर आगारातून बारा खाजगी चालकांद्वारे बस सेवा सुरू
पासष्ट ते सत्तर फेऱ्या वाढणार

एसटीची धुरा खाजगी चालकांकडे ; इंदापूर आगारातून बारा खाजगी चालकांद्वारे बस सेवा सुरू
पासष्ट ते सत्तर फेऱ्या वाढणार
इंदापूर : प्रतिनिधी
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. सेवेत रुजू न झाल्याने राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तरी देखील कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम असल्याकारणाने महामंडळाने खाजगी चालकांची नेमणूक करून त्याद्वारे बस सेवा सुरू केली आहे.
इंदापूर आगारामध्ये सध्या बारा खाजगी चालकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याद्वारे मंगळवारी (दि.११) पहिल्यांदाच आगारातून बस धावल्या आहेत. इंदापूर आगारातून ९ डिसेंबर पासून बारामती,अकलूज या गावांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत.परंतु खाजगी चालकांची नेमणूक करण्यात आल्याने सध्या ६० ते ७० फेऱ्या वाढल्या असून रोजचा साडेचार हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती आगार प्रमुख मेहबूब मणेर यांनी दिली.
शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर या काळात कामावर रुजू न झाल्याने कारवाई करण्यात आली. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या.कित्येक बैठका झाल्या मात्र तोडगा काही निघाला नाही.सध्यातरी खाजगी चालकांद्वारे बससेवा सुरू करण्यात आली आहे.परंतु जे आंदोलनकर्ते कर्मचारी आहेत त्यांची समजूत काढून अथवा त्यांच्याबाबत ठाम निर्णय घेऊन शासन त्यांना कधी न्याय देणार हे पाहणे देखील औचित्याचे ठरणार आहे.