गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश
निवडणुकांचा कालावधी जवळ आला की गँगस्टरला सुगीचे दिवस येत असल्याचं चित्र सध्या दिसत

गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश
निवडणुकांचा कालावधी जवळ आला की गँगस्टरला सुगीचे दिवस येत असल्याचं चित्र सध्या दिसत
पुणे : प्रतिनिधी
मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयश्री मारणे या पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे याची पत्नी आहेत. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वात जयश्री यांनी पक्ष प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया मारणेंनी पक्षप्रवेशावेळी दिली.
जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आहेत.त्या महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत कोथरूडमधून निवडून आल्या होत्या. गजा मारणे हा ‘मकोका’च्या गुन्ह्यात यापूर्वी अटक होता. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. निवडणुकांचा कालावधी जवळ आला की गँगस्टरला सुगीचे दिवस येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मोहोळ याने आपल्या पत्नीच्या रुपाने महापालिकेच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
मोहोळ या भाजपकडून भुसारी कॉलनी-सुतारदरा या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मोहोळ यांना रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने मारणे यांना रिंगण्यात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मारणे यांचा रितसर पक्ष प्रवेशही ‘राष्ट्रवादी’ने केला आहे. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली होती. आता दोन्ही पक्षांमध्ये एक गँगस्टर सक्रिय होणार असल्याने कोण कोणावर टीका करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.