कदम विद्यालयातील शिक्षकांकडून ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे अध्यापन
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी विद्यालयाचा अनोखा उपक्रम

कदम विद्यालयातील शिक्षकांकडून ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे अध्यापन
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी विद्यालयाचा अनोखा उपक्रम
इंदापूर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनियर कॉलेज इंदापूर येथील शिक्षकांनी कोरोना महामारीच्या कारणाने शाळा सर्वत्र बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहतून बाहेर पडू लागले आहेत. शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन अध्यापन सर्व महाराष्ट्रभर सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन शिक्षणात सुरुवातीपासूनच भर दिला आहे. हे सगळे खरे असले तरी अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत किंवा ग्रामीण भागात त्याचा तितकासा प्रभाव पडत नाही. अशा परिस्थितीत गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचणे, विद्यार्थ्यांना गृहकार्य देऊन ते तपासणे,ऑनलाईन अध्यापनात येणारे अडथळे दूर करणे, त्यांच्या शंका जाणून घेणे, यावर विद्यालयातील शिक्षकांनी भर दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विद्यालयात प्रवेश असणारे विद्यार्थी हे इंदापूर शहर, वडापुरी, विठ्ठलवाडी, गलांडवाडी, शिंदेवस्ती, बेडसिंगे, गोखळी, तरंगवाडी, रामवाडी, पिंगळे वस्ती, वडाचे लवण,सातपुतेवस्ती, सरस्वती नगर इत्यादी ठिकाणचे आहेत.रोज एका वस्तीवर जाऊन त्या परिसरातील पालक व विद्यार्थाना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून मंदिर किंवा प्राथमिक शाळेत बोलावले जाते.त्याच ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांच्या सर्व समस्या सोडवतात. गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात येणारे अडथळे दूर करता येतात सेतु अभ्यासाचा आढावा घेता येतो तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहकार्य देता येते असे विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील यांनी सांगितले. विद्यालयाने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमास पालक वर्गातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाड्या-वस्त्यांवर पालक आपल्या पाल्यास घेऊन उपस्थित राहून आपल्या समस्या मांडत आहेत व सर्व समस्यांचे शिक्षकांकडून निरसन केले जात आहे.