कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतप्त घटना
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतप्त घटना
परवा रात्री (16 डिसेंबर) ही घटना घडली.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रसत्यावर उतरत संतप्त भावना व्यक्त केल्या.
बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात काल (17 डिसेंबर) धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो तरुण एकवटले होते. तसंच कोल्हापुरातही तरुणांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. कन्नड व्यावसायिकांचे हॉटेल्स बंद करण्यात आली.
- 65 वर्षांपूर्वीच्या ‘या’ घटनेमुळे बेळगावात साजरा होतो ‘हुतात्मा दिन’
- शिवाजी महाराजांनी खरंच हिंदुत्वाची व्होटबॅंक तयार केली का?
बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केलं आहे. शनिवारी सकाळी 8 ते रविवार सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे.
पोलिसांनी श्रीराम सेना हिंदूस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह 25 ते 30 शिवभक्तांना मध्यरात्री अटक केली आहे.
गुन्हेगाराला तातडीनं अटक व्हावी – एकनाथ शिंदे
शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.”
“कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय, त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही,” असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.